नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बँक ऑफ महाराष्ट्रा’तून बोलत असल्याचे भासवून पीडित खातेदार महिलेला (Woman) केवायसीची प्रक्रिया करुन देण्याच्या बहाण्याने गोपनीय माहिती जाणून घेत सायबर चोरट्यांनी दोन महिलांना सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा गंडा घातला आहे. ही रक्कम ऑनलाईन वर्ग करून घेत ही फसवणूक (Fraud) करण्यात आली आहे. याबाबत शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
नवीन पंडीत कॉलनीत राहणाऱ्या ६५ वर्षीय पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, त्यांना फेब्रुवारी महिन्यात विविध मोबाईल क्रमांकावरून फोन आले आणि बँक ऑफ महाराष्ट्रातून बोलत असल्याचे संशयितांनी (Suspcted) सांगितले. ‘तुमचे बँकखात्याची केवायसी अपडेट नसल्याने व त्याची मुदत संपल्याने खाते बंद होऊ शकते’, असे संशयिताने सांगून भिती दाखविली. त्यानंतर संशयिताने त्यांच्या व्हॉटसपवर व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी सायबर चोरट्याने पीडितेच्या बँके खात्याची केवायसी प्रक्रिया करण्यासाठी गोपनीय माहिती घेतली.
दरम्यान, यानंतर त्यांच्या सेव्हिंग खात्यातून त्याने तीन लाख रुपये वर्ग केले. त्यानंतर एफडी खाते ऑनलाईन तारण ठेऊन त्यावर त्यावर तेरा लाख अकरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये कर्ज मंजूर केले आणि सहा लाख अठ्ठ्चाऐंशी हजार पाचशे रुपये काढून घेऊन त्यांना नऊ लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपयांना गंडविले. याबाबत पोलीस (Police) तपास करत आहेत.
दुसऱ्या महिलेसही फसवले
सायबर चोरट्यांनी दुसऱ्या घटनेत जयश्री थोरात यांनाही त्यांच्या युको बँकेच्या केवायसी अपडेट करण्यासाठी संपर्क साधला. तर, बँकेचे मॅनेजर अशोक पटेल यांना संपर्क साधून मोबाईलवरूनच केवायसी अपडेट करण्यास सांगितले. त्यानुसार जयश्री थोरात यांनी संपर्क साधला असता संशयित सायबर भामट्याने त्यांच्या बँकेची गोपनीय माहिती घेतली. या गैरवापर करून बँक खात्यातून १३ व्यवहार करुन सहा लाख चौऱ्याऐंशी हजार एक्कावन्न रुपये काढून घेतले. दोन्ही गुन्ह्यात तब्बल सोळा लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एक्कावन्न रुपयांची फसवणूक केली. तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे हे करत आहेत.