Friday, April 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Cyclist Foundation : पंढरपूरमध्ये रंगला चार हजार सायकल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा

Nashik Cyclist Foundation : पंढरपूरमध्ये रंगला चार हजार सायकल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा

नाशिक | प्रतिनिधी Nasik

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने १३ वी सायकलवारी पार पडली. यंदा महाराष्ट्रभरातील ९१ सायकल क्लबच्या तब्बल ४ हजार सायकल वारकऱ्यांनी पंढरपूरच्या रिंगण सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

- Advertisement -

२० जून रोजी नाशिकहून सुरुवात झालेल्या या यात्रेचा पहिला मुक्काम अहिल्यानगर येथे झाला. २१ जून रोजी सायंकाळी सर्व सायकलिस्ट सुखरूप पंढरपूरला पोहोचले. २२ जून रोजी सकाळी प्रभातफेरीने सुरुवात करून, विठ्ठल मंदिराला नगरप्रदक्षिणा करत सर्व सायकलिस्ट रेल्वे ग्राउंडवरील रिंगणासाठी एकत्र आले.

गेल्या तीन वर्षांपासून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या पुढाकाराने हा सायकल रिंगण सोहळा एक दिवसीय एकत्रित उपक्रम म्हणून साजरा केला जात आहे. यावर्षी लातूर सायकलिस्ट क्लबने यजमानपद भूषवले. विशेष रांगोळीने आखलेल्या रिंगणात सायकलिस्टनी ‘विठू नामाचा’ गजर करत शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला.

या सोहळ्याला केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ‘फिट इंडिया मुव्हमेंटमध्ये सायकलिस्टचा मोठा वाटा असून, आपली भेट ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे,’ असे त्या म्हणाल्या. त्यांनी स्वतः रिंगणात सहभागी होऊन सायकलिस्टची भेट घेतली.

दृष्टीहीन सायकलिस्ट्सनी टँडम सायकलवर पंढरपूर वारी केली, याचे विशेष कौतुक करण्यात आले. याशिवाय पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार धर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. विठ्ठलाचे भजन कानावर पडताच अनेक सायकलप्रेमी आनंदाने नृत्य करत, झेंडे फडकावत भक्तीत तल्लीन झाले.

यानंतर विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास प्रांगणात ‘चतुर्थ अखिल महाराष्ट्र सायकल वारी संमेलन २०२५’ पार पडले. भारतातील पहिले सोलो रॅम फिनिशर डॉ. अमित समर्थ यांनी ६७५ किमीचा सायकल प्रवास करून ३२ तासांत पंढरपूर गाठत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

सहकार राज्यमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या संमेलनात पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली. नाशिकचे किशोर काळे यांना विशेष ट्रॉफी, तर डॉ. मनिषा रौंदळ यांना सलग ११ वेळा वारीत सहभाग घेतल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. एका पायाने सायकल चालवणाऱ्या दिव्यांग सायकलिस्ट सुनील पवार यांचाही गौरव करण्यात आला.

सायबर क्राईमवरील पथनाट्य सादर करणाऱ्या नाशिक फाउंडेशन टीमलाही विशेष सन्मान मिळाला. प्रॅक्टिस राईड चॅलेंजचे पदक वितरणही यावेळी झाले. चंद्रकांत नाईक व रवींद्र दुसाने यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे, उपाध्यक्ष अरुण पवार, सचिव संजय पवार, संचालक दीपक भोसले, डॉ. मनिषा रौंदळ, पंकज पाटील, सुरेश डोंगरे, नितीन कोटकर आदींच्या मार्गदर्शनाखाली वारी यशस्वी झाली. वारी प्रमुख आयपीएस संजय बारकुंड, माधुरी गडाख, प्रवीण कोकाटे, बजरंग कहाटे यांनी विशेष मेहनत घेतली.

पांडुरंगाच्या भक्तीभावात ही सायकल वारी पार पडली

ताज्या बातम्या

Ahilyanagar : शालार्थ आयडी चौकशीसाठी नगरच्या शिक्षणाधिकार्‍यांना एसआयटीची नोटीस

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik जळगाव येथील बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात विशेष तपास पथकाने (एसआयटी) जळगाव जिल्ह्यातील विद्यमान माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच तत्कालीन 11 शिक्षणाधिकार्‍यांसह एकूण 48 अधिकार्‍यांना...