नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहर व जिल्ह्यात मागील दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील (Dam) एकूण जलसाठ्यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी २५ टक्के असलेला साठा आता ३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गंगापूरसह (Gangapur) इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) मंगळवारी ४५.३१ टक्के जलसाठा होता. बुधवारी रात्रीपासून नाशिक व त्र्यंबकेश्वर (Nashik and Trimbakeshwar) परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने २४ तासांत धरण ६५ टक्के भरले, म्हणजेच २० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. यामुळे नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न सध्या सुटला आहे. गंगापूर धरणात सध्या ६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा ४२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, गंगापूर धरणातून १,००० क्यूसेक, दारणा धरणातून (Darna Dam) ४,७४२ क्यूसेक, तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून २२,००० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. तर शुक्रवारी सकाळी ६ वाजता गंगापूर धरणातून ५५० क्यूसेक आणि ९ वाजता १,००० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. यासाठी ३ दरवाजे उघडण्यात आले होते.
गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला
आज (शनिवारी) दुपारी १२ वाजता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. ११६० क्युसेक वेगावरून २ हजार ३२० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असणारा पाऊस, ढगाळ हवामान यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढण्याची शक्यता असल्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिकमधील पाच धरणांतून पाण्याचा विसर्ग
नाशिक जिल्ह्यातील इतर ५ धरणातून देखील पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यात दारणा धरणातून ४,७४२ क्यूसेक, नांदूरमध्यमेश्वर धरणातून कालच म्हणजे शुक्रवारी रात्री ९ वाजता ९,४६५ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. याशिवाय कादवातून ५३० क्युसेक, पालखेड धरणातून १,३५० क्युसेक, आणि होळकर पुलाखालून १४४६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
नदीकाठची परिस्थिती सामान्य
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे दुतोंड्या मारुती मंदिरापर्यंत पाणी चढले होत. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्याने शुक्रवारी हे पाणी पायापर्यंत खाली उतरले. शहरातील सखल भागात पाणी साचले होते, दुचाकी बंद पडल्या, तसेच काही घरांमध्येही पाणी घुसल्याने महिलांनी रात्रभर पाणी काढले. सध्या मनपाच्या वॉटरग्रेसकडून नदीकाठ साफ करण्याचे काम सुरू आहे. धार्मिक विधी पुन्हा सुरू झाले असून वाहनतळांवर वाहनांची वर्दळही सुरू झाली आहे.




