ओझे | विलास ढाकणे | Oze
शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप व्हावा आणि ऊस पळवापळवीचे संकट टाळता यावे, यासाठी कादवा कारखान्याचे २५०० वरून ३५०० टीसीडी गाळप क्षमतेपर्यंत विस्तारीकरण करण्यात येत आहे. या विस्तारीकरणामुळे गाळप क्षमता वाढण्याबरोबरच उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी ऊस उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन कादवा सहकारी साखर कारखान्याचे (Kadwa Sugar Factory) चेअरमन श्रीराम शेटे (Shriram Shete) यांनी केले. कादवा सहकारी साखर कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर झाली. सभेच्या अध्यक्षस्थानावरून चेअरमन श्रीराम शेटे बोलत होते.
सन २००७ मध्ये कारखान्याची जबाबदारी स्वीकारली त्यावेळी कारखाना मोठ्या आर्थिक संकटात होता. बँक कर्ज थकीत होते, व्यापारी देणी होती आणि सरकारची हमी मिळत नसल्याने कर्ज उपलब्ध होत नव्हते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी (Farmer) ठेवी देऊन पतसंस्था उभी केली आणि त्यातून कारखाना पुन्हा सुरू करण्यात आल्याचे शेटे यांनी सांगितले. पहिल्या पंचवार्षिक काळात कारखान्याला आर्थिक स्थैर्य देण्यात आले. दुसऱ्या पंचवार्षिक काळात १२५० टीसीडी क्षमतेचे आधुनिकीकरण करून गाळप क्षमता २५०० मेट्रिक टन प्रतिदिन करण्यात आली. तिसऱ्या पंचवार्षिक काळात इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यात आला. भविष्यात सीएनजी (CNG) तसेच खत प्रकल्प उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
ऊस पळवापळवीचे संकट आणि शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करण्याच्या दृष्टीने २५०० वरून ३५०० टीसीडी गाळप क्षमतेचे विस्तारीकरण हाती घेण्यात आले आहे. या कामाचा डीपीआर ११७ कोटी रुपयांचा असून विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे ऊस वेळेत तोडणी व गाळप होऊन उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होईल, असे शेटे यांनी स्पष्ट केले. चालू वर्षी कारखान्याकडे सुमारे ११ हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. मात्र एकरी उत्पादन कमी असल्याने उत्पादकता वाढविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, माती परीक्षण, ड्रोन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी उत्पादन वाढवावे तसेच जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, सभेच्या व्यासपीठावर मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील, मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव, बाजार समिती सभापती प्रशांत कड, उपसभापती दत्तू भेरे, नगरसेवक कमलेश बोडके, शिवसेना संपर्कप्रमुख सुनील पाटील, व्हा. चेअरमन शिवाजीराव बस्ते, तसेच सर्व संचालक उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस संचालक शहाजी सोमवंशी यांनी स्वागत केले, तर संचालक सुकदेव जाधव यांनी आभार मानले.
१५ ऑक्टोबरऐवजी गाळप हंगाम उशिरा सुरू करण्याची मागणी
यावेळी जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील यांनी यंदा ऊस अद्याप पूर्णपणे परिपक्व झालेला नसल्याने १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याऐवजी १५ दिवस ते एक महिना उशिरा गाळप सुरू करण्याचा ठराव मांडला. ऊस परिपक्व झाल्यानंतर गाळप केल्यास साखर उतारा वाढून शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
विरोधी गटाकडून कारभारावर सवाल
सभेत विरोधी गटातर्फे ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, आवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, सचिन बर्डे व रवींद्र मोरे यांनी चर्चेत सहभाग घेत संस्थेच्या कारभाराबाबत विविध सवाल उपस्थित केले. पुरेसा ऊस उपलब्ध नसताना विस्तारीकरण करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रश्नांना चेअरमन श्रीराम शेटे यांनी उत्तरे दिली. चर्चेत गणपतराव पाटील, रावसाहेब भालेराव, संपत कोंड, रवींद्र मोरे, शिवानंद संधान, संपत कावळे, बबनराव देशमुख, सुभाष मातेरे, तानाजी पगार आदींनी सहभाग घेत विविध सूचना मांडल्या. सातत्याने संस्थेला लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळाल्याबद्दल मातेरेवाडी ग्रामस्थांतर्फे संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.
ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांचा सत्कार
सभेत सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच पिक प्रकारानुसार सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मातेरेवाडी गटातून श्रीराम शेटे, दिंडोरी गटातून राजेंद्र देशमुख, कसबे वणी गटातून चिंतामण जाधव, वडनेर भैरव गटातून अनिल पवार, तर चांदवड गटातून मधुकर टोपे यांचा गौरव करण्यात आला. पिक प्रकारात आडसालीमध्ये प्रथम समाधान देशमुख, द्वितीय भाऊसाहेब पाटील; पूर्व हंगामीमध्ये प्रथम मंदाकिनी मोरे, द्वितीय कमल भुसाळ; सुरू प्रकारात प्रथम शिवाजी पाटील, द्वितीय दौलत पिंगळ; तर खोडवा प्रकारात प्रथम रामनाथ फुगट, द्वितीय रवींद्र मोरे यांचा सत्कार करण्यात आला. कर्मचारी वर्गातून बापूराव शिंदे यांचा गौरव करण्यात आला.




