म्हेळुस्के | वार्ताहर | Mheluske
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) लखमापूर औद्योगिक परिसरातील एका कंपनीच्या आऊटलेटमधून अत्यंत विषारी आणि केमिकल मिश्रित दूषित पाणी थेट पवित्र कादवा नदीपात्रात सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या रसायनमिश्रित पाण्यामुळे नदीपात्रातील शेकडो मासे, खेकडे, बेडके आणि बगळे तडफडून मृत्युमुखी पडले आहेत. या गंभीर प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, संबंधित आस्थापनावर कठोर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर कंपनीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दूषित पाण्यामुळे जीवसृष्टी धोक्यात
लखमापूर औद्योगिक परिसरातील (Lakhmapur industrial Area) संबंधित कंपनीमध्ये प्लॅस्टिकसारख्या विघातक कच्च्या मालावर पुनर्प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर घातक रासायनिक द्रव्यांचा वापर होत असल्याचा संशय आहे. नदीत सोडण्यात आलेले हे पाणी पूर्णपणे काळे पडले असून त्यावर केमिकलचा जाड तवंग आणि पांढरा फेस साचला आहे. तसेच परिसरात उग्र व दुर्गंधीयुक्त वास पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक गावे आणि महत्त्वाच्या प्रकल्पांचे पिण्याचे पाणी धोक्यात
कादवा नदीच्या पाण्यावर लखमापूर, म्हेळुस्के, अवनखेड, परमोरी, पिंपळगाव केतकी यांसह नदीकाठच्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि शेती सिंचन अवलंबून आहे. हे पाणी पुढे पालखेड धरण समूहातून विसर्ग केले जात असल्याने, संपूर्ण निफाड आणि येवला तालुक्याची तहान तसेच ओझर येथील ‘एचएएल’ (HAL) सारख्या अत्यंत महत्त्वाच्या संरक्षण प्रकल्पाची गरज यावर अवलंबून आहे. हे विषारी पाणी शेतीत वापरल्यास पिकांचे नुकसान आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी
या जलप्रदूषणाचा त्रास निफाड आणि येवला तालुक्यांपर्यंत पोहोचल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि आमदार दिलीप बनकर यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून दोषींवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.
कंपनीचे म्हणणे काय?
याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “कंपनी कार्यक्षेत्राबाहेर अनेक नाले असून आजूबाजूला इतरही प्लांट असल्याने नक्की हे पाणी कुणाचे याची माहिती नाही. कादवा नदीपात्रात विसर्जित होणारे दूषित पाणी आमच्या कंपनीचे नसून, आम्ही आमच्या सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते कंपनीतच वापरात आणतो”, असे त्यांनी म्हटले.
संबंधित कंपनीच्या आऊटलेटचे दूषित पाणी आमच्या पवित्र आणि स्वच्छ अशा कादवा नदीपात्रात सोडून स्थानिकांच्या भावनांना ठेच पोहोचविली आहे. या गंभीर प्रकाराची माहिती आम्ही दिंडोरीचे तहसीलदार मुकेश कांबळे आणि प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे यांना दिली असून, घटनेचे फोटो व व्हिडीओ पुरावेही त्यांना पाठविले आहेत. प्रशासनाने यावर तात्काळ कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
योगेश बर्डे (उपसरपंच, म्हेळुस्के)




