ओझे | वार्ताहर | Oze
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) ओझे शिवारातील (Oze Shivar) सहा ते सात पाणंद रस्त्यांवर गेल्या उन्हाळ्यात टाकण्यात आलेले खडीचे ढीग संपूर्ण पावसाळा उलटूनही तसेच पडून आहेत. संबंधित ठेकेदाराने हे काम अर्धवट अवस्थेत सोडून दिल्याने मळ्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांसह शेतकऱ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, या कामाचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) दिले नसल्याचे अधिकारी सांगत असल्याने, संबंधित ठेकेदाराला ही खडी टाकण्याची परवानगी नेमकी कोणी दिली, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
वाहतुकीसाठी ‘तारेवरची कसरत’ आणि शेतीमालाचे नुकसान
रस्त्यांवर (Road) ठिकठिकाणी खडीचे मोठे ढीग पडून असल्याने यातील एक रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. उर्वरित रस्त्यांवरून वाहने चालवणे म्हणजे चालकांसाठी ‘तारेवरची कसरत’ ठरत आहे. संपूर्ण खरीप हंगामात भाजीपाला आणि विशेषतः टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे या खराब रस्त्यांमुळे मोठे हाल झाले. सध्या ओझे परिसरात ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, रस्त्यातील खडीच्या ढिगाऱ्यांमुळे ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने शेतात जाऊ शकत नसल्याने ऊस काढणी रखडली आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही ठेकेदार दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक अडवणूक होत आहे.
परवानगीचा सावळागोंधळ
हे सर्व रस्ते पाणंद रस्ते असून दिंडोरी पंचायत समितीच्या ‘एमआरईजीएस’ (MREGS) विभागाकडून मंजूर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, “आम्ही संबंधित ठेकेदाराला कोणत्याही कामाची परवानगी किंवा वर्क ऑर्डर दिलेली नाही,” असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अधिकारी अनभिज्ञ, शेतकऱ्यांची चौकशीची मागणी
तसेच हा ठेकेदार बाहेरचा असून अधिकाऱ्यांची परवानगी नसताना त्याने रस्त्यावर खडी कोणाच्या सांगण्यावरून टाकली, हे संपूर्ण परिसराला पडलेले कोडे आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांची अडवणूक करणारे हे खडीचे ढीग तातडीने बाजूला करावेत, असेही शेतकर्यांनी म्हटले आहे. प्रशासनाची परवानगी नसताना रस्त्यावर खडी टाकून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी आणि रस्ते तात्काळ वाहतुकीसाठी मोकळे करून द्यावेत, अशी मागणी ओझे परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.




