नाशिक | प्रतिनिधी | Nashi
विधानसभा निवडणुकीमध्ये (Vidhansabha Election) मतदानाचा टक्का यंदा वाढला असला तरीही प्रत्यक्षात १५ लाख ६३ हजार (३१ टक्के) मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने यावर विचार करण्याची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातून (District) एकूण ५० लाख ६१ हजार १८५ मतदार मतदान यादीत होते. त्यापैकी ३४ लाख ९८ हजार २५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मागील २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत हा टक्का ७ टक्क्यांनी वाढला असला तरी अजूनही १५ लाख ६२ हजार मतदारांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने ही चिंतेची बाब आहे. लोकांसाठी लोकांनी चालवलेले लोकांचे राज्य अशी लोकशाहीची संकल्पना आहे. आपल्या मतदानावर लोकशाही (Democracy) आधारित असल्याने शंभर टक्के मतदान होणे अपेक्षित आहे. मात्र शासन, प्रशासन, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सातत्याने मतदानासाठी मतदारांना आवाहन केले जात होते. मात्र आपल्या मतदानाच्या हक्कापासून गाफील राहून बेजबाबदारीने वागणाऱ्या १५ लाख ६२ हजार मतदारांनी आपला हक्क बजावण्याचे टाळल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, शासनाच्या माध्यमातून ‘स्वीप’ या संकल्पनेतून मतदार जनजागृती करण्यात आली होती. त्यासाठी वोटोबा, वोटोथॉन, रन, व्होट कर नासिककर अशा विविध संकल्पनात नाशिकच्या चित्रपट अभिनेत्यांच्या माध्यमातून आवाहन करून जनजागृती करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. त्यात काही अंशाने यश मिळालेले असले तरी अजुनही मोठी संधी त्यात असल्याने ‘त्या’ मतदारांना जागृत करून हा आकडा वाढवण्याच्या दृष्टीने प्रशासन तयारीला लागले असल्याचे चित्र आहे.
पुरुषांपेक्षा महिला पुढे
यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. २०१९ च्या निवडणुकीत ६४.७० टक्के पुरुषांनी तर ५७.६ टक्के महिलांनी मतदान केले होते. २०२४ च्या निवडणुकीमध्ये ७०.४४ टक्के पुरुषांनी तर ६७.७१ टक्के महिलांनी मतदान केले आहे. यात पुरुषांचा ५.७४ टक्के मतदान वाढले असले तरी महिलांची मात्र १०.११ टक्के मते वाढल्याने ही बाब उत्साहवर्धक असल्याचे जाणकारांचे मत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा