नाशिक | प्रतिनिधी
शेतकरी, महागाई, महिला असुरक्षितता, बेरोजगार सामाजिक असंतोष याबाबत जनतेत जाऊन जागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून आता नाशिक जिल्ह्यात तालुकास्तरावर तसेच जिल्हा परिषद गट व गण निहाय जनसंवाद यात्रा (Jansanvad Yatra) काढण्यात येणार आहे.
नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Nashik District Congress Comittee) वतीने ३ ते १२ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय जनसंवाद यात्रेच्या नियोजनाच्या निमित्ताने जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली व जनसंवाद यात्रेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक शरदराव आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन येथे बैठक झाली.
यावेळी आहेर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रा होणार असून या यात्रेच्या निमित्ताने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण या प्रत्येक ठिकाणीही यात्रा आजी – माजी आमदार – खासदार, जिल्हा नेते, तालुका अध्यक्ष, विविध आघाड्यांचे प्रमुख यांना सोबत घेऊन नियोजन करण्याचे सुचना केली.
यावेळी आ. हिरामण खोसकर, माजी आ. शिरीषकुमार कोतवाल, भास्कर गुंजाळ, संपतराव सकाळे आदींनी मनोगत व्यक्त केलें. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी केले.