नाशिक | Nashik
शहरासह ग्रामीण भागातील साथीच्या रोगांच्या प्रादुभार्वाने आरोग्य व्यवस्था डळमळीत झाल्याचे चित्र आहे. १ जानेवारी ते ७ ऑगस्ट २०२४ दरम्यान जिल्ह्यातील ७८० डेंग्यूचे रुग्ण आढळले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक मनपा हद्दीत डेंग्यूचा वाढता प्रसार लक्षात घेता नाशिक महापालिकेला डासांची उत्पत्ती स्थळे शोधून तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
हे देखील वाचा : ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन
पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच शहरासह जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. मागील सात महिन्यांत डेंग्यू संक्रमणाची परिस्थिती गंभीर होताना दिसून येत आहे. मलेरिया विभागाकडून शहरात व ग्रामीण भागात औषध व धूर फवारणी होत असून विविध ठिकाणांना भेटी देत डेंग्यूचे हॉटस्पॉट नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीदेखील डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत.
हे देखील वाचा : नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची मंजुरी
नाशिक मनपा क्षेत्रात ३ हजार ६१ रुग्णांची डेंग्यू चाचणी केली. त्यात ६२५ रुग्ण बाधित आढळून आले. त्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात १,२१२ रुग्णांची डेंग्यू चाचणी झाली. त्यात १३३ रुग्ण डेंग्यूने बाधित झाल्याचे समोर आले आहे. यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर मालेगाव महापालिका क्षेत्रात ३२५ जणांची चाचणी झाली. त्यात २२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. असे जिल्ह्यात एकूण ४,५९८ डेंग्यू संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात ७८० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
हे देखील वाचा : संपादकीय : १० ऑगस्ट २०२४ – उत्तमतेची प्रक्रिया थांबणे हिताचे नाही
दरम्यान, डेंग्यू आजाराचा वाढता धोका लक्षात घेता मनपाच्या सहाही विभागांत विशेष तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात घरोघरी भेटी दिल्या जाणार असून, घरात व अवतीभोवती डेंग्यू डासांच्या अळ्या व उत्पत्तीसाठी पोषक वातावरण आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. संपूर्ण शहरात पंधरा दिवस ही मोहीम राबवली जात आहे.
हे देखील वाचा : अदानीनंतर आता कोणाचा नंबर? Hindenburg Research च्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण
डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. डेंग्यू ताप विशिष्ट विषाणूमुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवून राहिलेल्या पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी तयार होतात. त्यानंतर अंड्याचे रूपांतर डासात होते. कोणतेही साठवलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नये. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
बाबासाहेब पारधे, अपर जिल्हाधिकारी, नाशिक
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा