नाशिक | Nashik
जिल्ह्यातील सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील विविध गावांमध्ये शनिवार (दि.२६) रोजी दिवसभरात आणि रात्रीच्या सुमारास भूकंपाचे लागोपाठ धक्के जाणवले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नव्हती. मात्र, आता अवघ्या काही तासांतच पुन्हा एकदा या भागाला भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
खिडक्या आणि पत्रे हादरले
मिळालेल्या माहितीनुसार, सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात काल (शनिवार) सकाळी भूकंपाचा पहिला धक्का बसला होता. त्यानंतर रात्री ११.५६ च्या सुमारास कळवण तालुक्यातील दळवट आणि आसपासच्या परिसरात पुन्हा भूकंपाचे तीव्र सौम्य धक्के जाणवले आहेत. सुमारे २० ते ३० सेकंद जमीन हादरत असल्याने घरातील खिडक्या, भिंती आणि छतावरील पत्रे वाजायला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिक तात्काळ भीतीने घराबाहेर पडले. याच दरम्यान रात्री ११.५५ वाजेच्या सुमारास सुरगाणा शहर आणि बोरगाव परिसरातही दुसऱ्यांदा धक्का बसला असून, या धक्क्याची तीव्रता ३.६ इतकी असल्याचे समोर आले आहे.
पहाटे २.४५ वाजता पुन्हा थरथरली जमीन
रात्रीच्या धक्क्यांनंतर नागरिक सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच पहाटे (रविवार) २.४५ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा जमीन थरथरली. सुरगाणा तालुक्यातील सराड, चिखली आणि बोरगाव परिसरात पहाटेच्या वेळी तिसऱ्यांदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. अवघ्या काही तासांत लागोपाठ तीन ते चार वेळा जमीन हादरल्याने अनेक गावकऱ्यांनी भीतीपोटी संपूर्ण रात्र घराबाहेर जागून काढली.
प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
अचानक बसलेल्या या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असले, तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कुठेही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती स्थानिक तहसीलदारांनी दिली आहे. तसेच, नागरिकांनी अजिबात घाबरून न जाता आवश्यक ती सतर्कता बाळगावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ननाशी , दळवट परिसरात भूकंपाचे दोन धक्के
ननाशी व बाडगीचापाडा परिसरात शनिवारी मध्यरात्री भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्री 11.55 वाजता 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा तर रविवारी पहाटे 2.44 वाजता 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद झाली. या दोन्ही धक्क्यांंमुळे परिसरातील अनेक नागरिक झोपेतून जागे झाले.
धक्क्यावेळी अनेकांना जमीन हलल्याचा अनुभव आला. काही नागरिकांनी भूगर्भातून गडगडाटासारखा आवाज ऐकू आल्याचे सांगितले.




