नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मागील तब्बल आठ वर्षांपासून रखडलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी (Nashik NMC Election) आज (सोमवारी) प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी विभागीय कार्यालय परिसर राजकीय हालचालींनी गजबजून गेला होता. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान नाशिकमध्ये महायुतीची (Mahayuti) घोषणा झाली नसली तरी प्रमुख नेत्यांसह इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यामध्ये भाजपा आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे प्रभाग क्रमांक ७ मधून नाशिक महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. आज त्याने उमेदवारी अर्ज भरला असता त्यावेळी संपूर्ण फरांदे कुटुंब उपस्थित होते. तर चार दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिनकर पाटील यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच शिंदेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे यांनी मोटरसायकल रॅलीद्वारे संपूर्ण प्रभागातून मिरवणूक काढत अर्ज दाखल केला.तर इंदुबाई नागरे यांनीही मोठ्या कार्यकर्त्यांच्या जथ्यासह उमेदवारी अर्ज भरला.
तसेच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे (MLA Seema Hiray) यांची मुलगी रश्मी बेंडाळे-हिरे, दीर माजी नगरसेवक योगेश (मुन्ना) हिरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सीमा हिरे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केले. याशिवाय माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या पत्नी योगिता हिरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनीही प्रभाग क्रमांक ७ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक इच्छुकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत असला, तरी तिकिट कोणाला मिळणार आणि प्रत्यक्ष उमेदवारी कोणाची राहणार याबाबत संभ्रम स्पष्टपणे जाणवत होता. “पक्षाने अर्ज भरायला सांगितला आहे,” अशी भावना अनेक इच्छुकांनी व्यक्त केली. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक लढवणार की नाही, याबाबत स्पष्ट भूमिका कुणीही मांडताना दिसून आले नाही. त्यामुळे माघारी अर्जाच्या टप्प्यांनंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.




