Friday, November 22, 2024
Homeनाशिकनाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर ‘इकॉनॉमी’ क्लस्टर व्हावे : डॉ. गेडाम

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर ‘इकॉनॉमी’ क्लस्टर व्हावे : डॉ. गेडाम

17 वा स्थापना दिन उत्साहात

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

‘नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर’ हे शासकीय व खासगी क्षेत्राच्या भागीदारीचे उत्तम उदाहरण असून औद्योगिक क्षेत्राला तांत्रिक सेवांबरोबरच कौशल्य प्रशिक्षणाचीदेखील जबाबदारी पार पाडत आहे. महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्यासाठी नाशिक हे औद्योगिक विकासाचे केंद्र बनावे लागेल व नाशिकच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला ‘इकॉनॉमी’ क्लस्टर म्हणून विकसित करावे. कौशल्य प्रशिक्षण देऊन उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात व रोजगारनिर्मितीत नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे गौरवोद्गार विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी काढले.नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या 17 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

यावेळी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष मनीष कोठारी, संस्थापक अध्यक्ष विक्रम सारडा, संचालक शरद शहा, अशोक बंग, नरेंद्र बिरार, हेमंत राठी आदीे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. निमाचे सरचिटणीस निखिल पांचाळ, कार्यकारिणी सदस्य मनीष रावल, कैलास पाटील, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य, व्यवस्थापक दिनेश पाटील, आयमाचे अध्यक्ष ललित बूब, सरचिटणीस प्रमोद वाघ, सीमाचे विश्वस्त रतन पडवळ, सचिव बबन वाजे, कार्यकारिणी सदस्य मुकेश देशमुख, अतुल अग्रवाल, ज्ञानेश्वर भागवत, किरण भंडारी, सीआयआय नाशिकचे अध्यक्ष जॉय अलूर, माजी अध्यक्ष सुधीर मुतालिक, निपम नाशिकचे अध्यक्ष राजाराम कासार, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया, राजेंद्र कोठावदे, उमेश राठी तसेच अन्य उद्योजकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष मनीष कोठारी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. गेल्या 17 वर्षांपासून नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर उद्योग क्षेत्रास सेवा देत असून स्ट्राईव्हसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून ‘स्कील गॅप’ कमी करण्यासाठी युवकांना प्रशिक्षण दिले जाते. स्टार्टअप्सला सर्वतोपरी सहाय्य करून यशस्वी उद्योजक घडवले जातात. यापुढेदेखील अधिकाधिक सेवा देण्यावर भर राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. चालू वर्षात नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरने केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या स्ट्राईव्ह प्रकल्पांतर्गत 51 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन 17 कंपन्यांमध्ये अ‍ॅप्रेंटिसशिपची संधी मोफत उपलब्ध करून दिली. सदर प्रकल्पात बहुमोल सहकार्य केल्याबद्दल या 17 कंपन्यांच्या प्रतिनिधींचा नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे संस्थापक अध्यक्ष आणि संचालक विक्रम सारडा यांनी, बिगरनफा तत्त्वावर चालणार्‍या पीपीपी संस्थांच्या स्वावलंबी विकासाचे उदाहरण म्हणून ‘नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर’चा उल्लेख विविध यंत्रणांकडून आवर्जून केला जात असल्याचे सांगितले. ‘नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर’द्वारे शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील नवउद्योजकांनादेखील सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. स्थापनेपासून आजतागायत नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या कार्याची व्याप्ती उत्तरोत्तर वाढत गेली असून भविष्यातदेखील यशाचे नवनवीन टप्पे पार करेल व त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे विक्रम सारडा यांनी सांगितले.

‘नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर’चे सीईओ एस.के. माथूर म्हणाले की, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या इनोव्हेशन इनक्युबेशन सेंटरद्वारे स्टार्टअप्स व नवउद्योजकांना व्यावसायिक संकल्पनेचे प्रत्यक्षात यशस्वी व्यवसायात रूपांतर होण्यापर्यंत सर्वतोपरी सहाय्य केले जाते. यातील पहिल्या व दुसर्‍या बॅचमधील स्टार्टअप उभारण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या चार स्टार्टअप्सला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्टार्टअप्समध्ये व्हीआरबी प्रॉडक्ट्स, एसचार्ज, कॉर्टेक्स एआय इन्वेंशन्स, भूमिपुत्र एंटरप्रायझेस यांचा समावेश आहे. आभार सीईओ एस. के. माथूर यांनी मानले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या