इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar
मुंबई–आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाटा चौफुली येथील उड्डाण पुलावर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एसटी महामंडळाच्या बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. टायर फुटल्याने बसने पेट घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सुदैवाने बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
नंदुरबार डेपोची (क्रमांक MH15 JC 5512) ही बस नाशिक डेपोतून मुंबई महामार्ग गॅरेजकडे नेत असताना पाथर्डी फाटा चौफुलीवरील उड्डाण पुलावर मागील बाजूचा टायर अचानक फुटला. त्यानंतर काही क्षणातच बसच्या मागील भागातून धूर व आगीचे लोळ उठू लागले. ही बाब पाठीमागून येणाऱ्या वाहनातील सचिन ठाणगे या युवकाच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ बसच्या पुढे जाऊन चालकाला सतर्क केले. तोपर्यंत बसच्या मागील भागाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती.युवकाने प्रसंगावधान राखत बसमधील सिलेंडर काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनेची माहिती तातडीने नवीन नाशिक अग्निशमन दलाला देण्यात आली.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुमारे ४० मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या बसमध्ये चालक एन. ए. न्याहाळदे आणि मेकॅनिकल पठाण कर्मचारी उपस्थित होते. आग लागल्यानंतर वाहतूक नियंत्रण कक्षाने त्वरित उड्डाण पुलावरील वाहतूक थांबवून टप्प्याटप्प्याने खालील महामार्गावरून वळवली. आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक भगवान दोंदे, जितेंद्र चोरडिया, बाळकृष्ण शिरसाट शिरसाट आदीनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला हातभार लावला. तसेच केंद्रप्रमुख हर्षद पटेल, ट्रेडिंग फायरमन पी. जी. लहांमगे, वाहनचालक एस. एस. पवार, आय आय काझी ट्रेनी फायरमन लाड, जोशी, शिंदे, हिरवे, शेवाळे आदी अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. सुदैवाने प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील तपास संबंधित विभागाकडून सुरू आहे.




