Wednesday, May 20, 2026
Homeक्राईमNashik Fraud Crime : शेअर मार्केटच्या नावाखाली दाम्पत्याला साडेचार लाखांचा गंडा; 'पर...

Nashik Fraud Crime : शेअर मार्केटच्या नावाखाली दाम्पत्याला साडेचार लाखांचा गंडा; ‘पर ट्रेड’चे बंटी बबली पसार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शेअर मार्केटच्या (Share Market) नावाखाली अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढणाऱ्या एका हायप्रोफाईल ‘बंटी-बबली’चा कारनामा नाशिकमध्ये (Nashik) उघडकीस आला आहे. दरमहा तब्बल १० टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून ‘पर ट्रेड’ कंपनीच्या चालक दाम्पत्याने आनंदवली येथील एका बँक कर्मचाऱ्यास तब्बल चार लाख ४७ हजार ५०० रुपयांना चुना लावला आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात (Gangapur Police Station) ‘पर ट्रेड’ कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी संशयित लक्ष्मी शर्मा उर्फ लक्ष्मी हितेश लाखे आणि तिचा पती हितेश अरुण लाखे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

- Advertisement -

सोनालीका हर्षल माळी (३२, रा. आनंदवली, गंगापूर रोड) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे सोनालीका यांचे पती हे बँकेत नोकरीस आहेत. त्यांचे मित्र अशोक चौरे हे इंदिरानगर (Indiranagar) येथील अशोका मेडिकेअर हॉस्पिटलजवळ असलेल्या ‘पर ट्रेड’ या कंपनीच्या कार्यालयात काम करत होते. चौरे यांनी दिलेल्या १० टक्के परताव्याच्या माहितीवर विश्वास ठेवून माळी दाम्पत्याने मार्च २०२५ मध्ये प्रथम तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली.

एप्रिल २०२५ मध्ये माळी दाम्पत्याला पहिल्या गुंतवणुकीवर (Investment) ११ हजार ४०० रुपयांचा परतावा मिळाला. हा परतावा म्हणजेच जाळ्यात ओढण्यासाठी टाकलेला ‘गळ’ होता. परतावा मिळाल्याने माळी यांनी थेट कंपनीचे कार्यालय गाठले. तेथे मुख्य सूत्रधार हितेश लाखे याने पत्नी लक्ष्मी शर्मा ही कंपनीची सीईओ असल्याचे सांगत, “लोकांनी इथे कोट्यवधी रुपये गुंतवलेत, तुम्ही काळजी करू नका,” असा आव आणला. या भूलथापांना बळी पडून माळी यांनी २ मे रोजी पुन्हा १ लाख रुपये दिले. जुलै २०२५ मध्ये हितेशने नवीन चाल खेळत “आणखी गुंतवणूक केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल” असा मेसेज पाठवला. या आमिषाला बळी पडून माळी यांनी ऑनलाइन बँकिंगद्वारे आणखी ४७ हजार ५०० रुपये हितेशच्या खात्यावर वर्ग केले.

​…आणि ‘ऑफिस’ला ठोकले कुलूप!

​३ ऑगस्ट २०२५ रोजी जेव्हा माळी यांनी व्हॉट्सअॅपवर हक्काच्या परताव्याची मागणी केली, तेव्हा हितेशने नेहमीप्रमाणे “मिळून जाईल” असे उत्तर दिले. मात्र, दोनच दिवसांत म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी हितेशचा फोन अचानक स्विच ऑफ झाला. संशय आल्याने माळी यांनी तातडीने इंदिरानगर येथील कार्यालय गाठले, मात्र तिथे ‘पर ट्रेड’च्या नावावर एक कुलूप दिसले. चौकशी केली असता, हे दाम्पत्य गाशा गुंडाळून पसार झाल्याचे समोर आले.

लाखोंचा शाेध सुरु

​आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच माळी दाम्पत्याने पोलिस ठाणे गाठले. गंगापूर पोलिसांनी कारवाई करत लक्ष्मी हितेश लाखे (वय ३५) आणि हितेश अरुण लाखे (वय ३९, दोघे रा. जयश्री रेसिडेन्सी, गोविंद नगर, नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक श्रीराम पाटील प्रकरणाचा तपास करत आहेत. या ‘पर ट्रेड’ कंपनीने नाशिकमधील इतरही अनेक लोकांना अशाच प्रकारे गंडा घातल्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Nashik Water News : धरण समूहात ३१.५९ टक्के पाणीसाठा; ११८ टँकरद्वारे...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik तापमानात होणाऱ्या वाढीसोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागात (Rural Area) पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. जलसाठ्यांचे होणारे बाष्पीभवन, भूगर्भातील पाणी पातळी खोल...