नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कमी गुंतवणुकीत अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी (Cyber Theives) म्हसरुळ येथील ३५ वर्षीय खासगी नोकरदाराची तब्बल ९९ लाख ५० हजार ५१० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयितांनी फिर्यादीला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून ‘ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग’ च्या नावाखाली विश्वास संपादन केला आणि वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये (Bank Account) पैसे वर्ग करण्यास भाग पाडले. अखेर पैसे परत न मिळाल्याने फिर्यादीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
ही फसवणूक ८ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली. फिर्यादी नोकरदाराच्या मोबाईलवर प्रथम अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. त्यानंतर एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून घेतले. या ग्रुपमध्ये शेअर मार्केट, ऑनलाईन ट्रेडिंग व क्रिप्टो गुंतवणुकीबाबत आकर्षक पोस्ट, स्क्रीनशॉट व नफ्याचे दाखले टाकले जात होते. यानंतर, फिर्यादीला https://www-tscmhnw-cc/discover या बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची लिंक पाठवून तेथे खाते उघडण्यास सांगितले. सुरुवातीला कमी रकमेची गुंतवणूक करून थोडा परतावा दाखविण्यात आल्याने तक्रारदाराचा विश्वास दृढ झाला.
त्यानंतर “मोठी गुंतवणूक केल्यास जास्त नफा” मिळेल, असे सांगून वेगवेगळ्या टप्प्यांत मोठ्या रकमा ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले. दरम्यान, एकूण ९९ लाख ५० हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्स्फर झाल्यानंतर तक्रारदाराने या रकमेसह दिसणारा कोट्यवधी रुपयांची नफा खात्यातून काढण्याची प्रक्रिया केली. पण, त्यात अडचणी आल्या. त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित मोबाईल क्रमांक, व्हॉट्सअॅप ग्रुप व वेबसाईट बंद केल्याचे दिसल्याने त्याच्या पायाखालील वाळू सरकली. यानंतर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आता अज्ञात व्हॉट्सअॅप क्रमांक व पैसे वळते झालेले बँक खातेदार यांचा शोध सुरू आहे. तपास वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करत आहेत.
अडीच कोटींचा नफा!
फिर्यादीने गुंतवणूक केली असता संशयितांनी त्याला ऑनलाइन स्वरुपात अडीच कोटी रुपयांचा नफा ‘अभासी’ स्वरुपात दर्शविला. त्यामुळे फिर्यादीने हे पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी नानाविध कारणे सांगून पैशांची मागणी केली. त्यामुळे संशय येताच त्यांनी अधिक चौकशी व पडताळणी केली. तेव्हा फसवणूक झाल्याचे उघड झाले. काही रक्कम शेकडो बँक खात्यातून काही मिनिटांत इतरत्र वर्ग झाली असून संशयितांचा माग काढला जात आहे.
कसे राहावे सतर्क?
- अनोळखी लिंक व अॅपवर गुंतवणूक करू नका
- व्हॉट्सअॅप/टेलिग्राम ग्रुपमधील सल्ल्यावर विश्वास ठेवू नका
- अधिकृत सेबी नोंदणीकृत प्लॅटफॉर्मचीच खातरजमा करा
- ‘खात्रीशीर नफा’ असे दावे करणाऱ्यांपासून सावध रहा
- संशयास्पद आढळल्यास सायबर हेल्पलाईन १९३० किंवा
- cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा




