नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शेअर मार्केटमध्ये (Share Market) दरमहा ४ ते ६ टक्के भरघोस परतावा देण्याचे आणि प्लास्टिक कंपनीत (Plastic Company) भागीदारीचे आमिष दाखवून नाशिकमधील वकील, सरकारी नोकरदार आणि अमलदारांसह ४० हून अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा (Fraud) घालणाऱ्या जानवलकर कुटुंबाचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.
संशयितांनी (Suspected) फसवणुकीची रक्कम हडप केल्यानंतर स्वतःचे राहते घर देखील २ ते ३ वेगवेगळ्या लोकांना साठेखत व खरेदीखत करून विकले आणि गेल्या वर्षभरापासून पळ काढला होता. या टोळीतील युवराज आणि यश या दोन भावांना नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने रायगड जिल्ह्यातून अत्यंत शिताफीने अटक केली आहे.
संशयित यश सुरेश जानवलकर, युवराज सुरेश जानवलकर, सुरेश बाबुराव जानवलकर आणि संगीता सुरेश जानवलकर या कुटुंबाने नाशिकमध्ये आपले जाळे विणले होते. त्यांनी ‘फ्युचर स्टॉक मार्केट अनॅलिसिस’ नावाची बनावट इन्व्हेस्टमेंट फर्म सुरू केली होती. एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या काळात त्यांनी अनेकांना जाळ्यात ओढले.
केवळ शेअर मार्केटच नव्हे, तर सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसी आणि अंबड (Ambad) येथील त्यांच्या प्लास्टिक बॉटल बनवण्याच्या कंपनीत भागीदारी देण्याचे आमिषही त्यांनी दाखवले. या आमिषाला बळी पडून समाजातील सुशिक्षित वर्ग, वकील व शासकीय कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये गुंतवले. एकट्या फिर्यादीची तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
राहते घरही विकले; संपूर्ण कुटुंबच फरार
गुंतवणूकदारांनी पैशांचा तगादा लावताच, या कुटुंबाने नाशिकमधील आपले राहते घर थेट २ ते ३ वेगवेगळ्या ग्राहकांना साठेखत आणि खरेदीखत दस्तऐवज करून विकून टाकले. तिथून जमापूंजी घेऊन संपूर्ण कुटुंबच नाशिक सोडून पसार झाले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
रायगडमध्ये धडक कारवाई
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ईओडब्लू व गुन्हे शाखा युनिट-२चे पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध घेत होते. संशयित रायगड जिल्ह्यात असल्याची गुप्त माहिती मिळताच, पथकाने खालापूर, नेरळ आणि खोपोली परिसरातून युवराज (वय ३२) आणि यश (वय ३०) या दोन्ही भावांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आई-वडील अजूनही फरार!
या गुन्ह्यातील मुख्य संशयित सुरेश जानवलकर व संगीता जानवलकर हे पती-पत्नी अजूनही पसार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. अंबड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. दीपक बागुल पुढील तपास करत असून, फसवणुकीचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. फसवणुक झालेल्यांनी तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




