नाशिक | Nashik
लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिककर सज्ज झाले असून घरोघरी बाप्पाला साश्रृनयनांनी, वाजत गाजत निरोप देण्यात येत आहे. सार्वजनिक मंडळांच्या वतीने देखील मंडळांच्या गणपतीला पारंपारिक वाद्यांच्या तालासुरात निरोप देण्यात येत आहे. नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मुख्य मिरवणुकीला सुरवात झाली आहे.
शहरातील वाकडी बारव येथे पालकमंत्री दादा भुसे, आ. देवयानी फरांदे, महानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष समीर शेट्ये, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, ठाकरे गटाचे विनायक पांडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गजानन शेलार आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री भुसे यांनी यावेळी गणेशाचे पुजन करत नारळ वाढवून गणपतीच्या मिरवणुकीला सुरवात केली. यावेळी त्यांनी स्वत: ढोलवादनाचा आनंद घेतला. उदघाटनानंतर मिरवणूक हळूहळू पुढे सरकू लागली. या मिरवणूकीत मानाच्या मंडळांसह २० पेक्षा अधिक मंडळांचा सहभाग आहे. सकाळी ११ वाजता मिरवणूकीला सुरवात करण्याचे पोलिसांचे नियोजन होते मात्र १२ वाजता मिरवणुकीला सुरवात झाली.
दादासाहेब फाळके मार्ग -महात्मा फुले मार्केट- दूधबाजार चौक- बादशाही लॉज कॉर्नर-गाडगे महाराज पुतळा-मेनरोड- धुमाळ पॉइंट- सांगली बँक सिग्नल-महात्मा गांधी रोड- मेहर सिग्नल-अशोकस्तंभ- नवीन तांबट गल्ली- रविवार कारंजा-होळकर पूल-मालेगाव स्टँड-पंचवटी कारंजा-मालविय चौक- परशुराम पुरियामार्ग- कपालेश्वर मंदिर-भाजी बाजार-म्हसोबा पटांगण हा मिरवणुकीचा मार्ग आहे. मिरवणूक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत मिरवणूक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भद्रकाली परिसरातील गल्ली बोळांमध्ये बॅरिकेटींग करण्यात आले आहे. तसेच खडकाळी सिग्नल परिसरात स्ट्रॅायकिंग फोर्स तैनात करण्यात आले आहे.
या मिरवणुकीत लेझर, गुलाल आणि डीजे नसावा, अशी स्पष्ट सूचना पोलिसांनी मंडळांना दिली आहे. दरम्यान, नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. शहरात विसर्जनासाठी तीन हजार पोलिसांचा फौजफाटा मध्यरात्री दीडपर्यंत तैनात राहणार आहे. सोबतच संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त कुमक सज्ज असून आवश्यक त्या उपाययोजना पोलिसांनी आखल्या आहेत.
यंदाच्या मिरवणुकीत ढोलताशा मंडळांचा सहभाग अधिक आहे. सायंकाळनंतर गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे. नियोजनानुसार शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गंगाघाटावर विसर्जनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा