सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
सिन्नर शहराजवळील (Sinnar City) सरदवाडी धरणात (Sardwadi Dam) गणपती विसर्जनाच्या दिवशी पाण्यात बुडून माळेगाव एमआयडीसीतील (MIDC) एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे सिन्नरमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट लागले. गणेश विसर्जनासाठी गेल्यानंतर पाय घसरून पाण्यात पडल्याने या कामगाराचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे (४०) रा. सिल्वर लोटस स्कूलजवळ, सिन्नर असे मृत कामगाराचे नाव आहे. ओमप्रकाश हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील (Gondiya District) रहिवासी होते. काही वर्षांपासून ते माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एचपी गॅस कंपनीत कार्यरत होते. ओमप्रकाश हे सिल्वर लोटस स्कूलच्यामागे धरणातून निघणाऱ्या सांडव्याजवळ असलेल्या डबक्यात गणेश विसर्जनासाठी गेले असताना पाय घसरून खाली पडले. त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात बुडाले.
दरम्यान, यावेळी त्यांच्यासोबत असलेले धोंडीबा बिन्नर, विकास राठोड तसेच लिल्हारे कुटुंबीयांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढून रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात (Sinnar Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार गोसावी पुढील तपास करीत आहेत.





