Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्यासरकारी शिक्षणाचा दर्जा खालावला; आमदार सत्यजित तांबे यांची टीका

सरकारी शिक्षणाचा दर्जा खालावला; आमदार सत्यजित तांबे यांची टीका

मुंबई | प्रतिनिधी

- Advertisement -

शिक्षण विभागात शिक्षकांच्या भरतीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने अवस्था बिकट आहे. अनुदानित शाळांना अनुदान वेळेत न मिळणे, वेतनेतर अनुदान न मिळणे यामुळे अनेक उपक्रमांना खिळ बसली आहे. या सर्व गोष्टींमुळे सरकारी शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे, अशी टिका विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून समूह शाळा सुरू करण्याचा निर्णय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी घातक असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

जुलै महिन्यात पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या सर्व प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत बैठक घेण्याची घोषणा केली होती. मात्र सप्टेंबर संपत आला तरी ही बैठक घ्यायला शालेय शिक्षणमंत्र्यांना वेळ मिळालेला नाही, याची आठवण तांबे यांनी केसरकर यांना करून दिली आहे.

शिक्षण क्षेत्रातील सर्वच प्रश्न महत्वाचे असून या प्रश्नांमुळे शिक्षणाच्या दर्जावर आणि थेट विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळे याप्रकरणी कोणतीही दिरंगाई न करता शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात चर्चा करून तोडगा काढण्यासाठी एक दिवसीय विशेष बैठकीचे आयोजन करण्याची मागणीही तांबे यांनी केली आहे.

डॉ. बाबासाहेब शिकलेल्या शाळेत शिक्षकच नाहीत

साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल या ऐतिहासिक वारसा असलेल्या शाळेत संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह औंधचे संस्थानिक भवानराव पंतप्रतिनिधी, श्रीमंत छत्रपती अण्णासाहेब भोसले, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राहिलेले डॉ. पी. जी. गजेंद्रगडकर, दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू रँग्लर जी. एस. महाजनी यांच्यासह अनेक कर्तृत्त्ववान व्यक्तींचे शिक्षण झाले आहे.

अशी देदीप्यमान परंपरा असलेल्या या शाळेत एप्रिल महिन्यापासून मराठी आणि इंग्रजी विषय शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याची बाब लाजिरवाणी आहे. गेल्या वर्षी या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची शिफारस राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेची ही अवस्था असेल, तर राज्यातील इतर सरकारी शाळांबद्दल तर न बोललेलेच बरे, अशा शब्दांमध्ये सत्यजित तांबे यांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजो व्यक्त केली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या