नाशिक । प्रतिनिधी Nashik
गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली नाशिक – जयपूर विमानसेवा आता नव्याने दि.1 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. या सेवेसाठी मंगळवार (दि.21) पासून बुकिंग सुरू झाले असून या सेवेला पूर्वीप्रमाणेच आताही प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
नाशिकमधून उद्योग, व्यापार, पर्यटन व कौटुंबिक भेटीगाठींसाठी राजस्थानला जाणार्यांची संख्या मोठी आहे. मात्र, येथून थेट विमानसेवा नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर ‘इंडिगो’ ने गेल्या 29 ऑक्टोबरपासून इंदूर मार्गे नाशिक-जयपूर थेट विमानसेवा सुरू केली होती. मात्र, दृश्यमानतेचा अभाव व अन्य काही तांत्रिक कारणांमुळे 14 डिसेंबरपासून ही सेवा खंडित करण्यात आली होती.
आता नव्याने सेवा पूर्ववत केली जात असून, यासाठीची बुकिंग मंगळवारपासून सुरू करण्यात आली.मात्र अल्पावधीत विमानाच्या 78 पैकी 58 आसने दुपारपर्यंत बुक झाल्याने पहिल्याच दिवशीच्या विमानाचे भाडे तब्बल 13 हजारांवर जाऊन पोहोचले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
ओझर येथून मंगळवार, गुरुवार व शनिवार असे आठवड्यातील तीन दिवस सेवा दिली जाणार आहे. या तिन्ही दिवशी जयपूर येथून सकाळी 11.20 वाजता उड्डाण घेऊन विमान दुपारी 2.20 वाजता ओझरला पोहोचेल, तर ओझर येथून दुपारी 2.40 वाजता भरारी घेऊन ते सायंकाळी 5.30 वाजता जयपूरला पोहोचेल. ते इंदूरला 20 मिनिटे थांबणार आहे.
ओझर विमानतळावरून सध्या नवी दिल्ली, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, गोवा, इंदूर, लखनौ व बंगळुरू या ठिकाणांसाठी सेवा दिली जात असून, त्यात जयपूरची भर पडणार आहे.
नाशिकमधून अन्य कंपन्यांनीदेखील आपल्या सेवा सुरू कराव्यात यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. एअर इंडिया, अकासा या कंपन्यांशी बोलणी सुरू आहे. चेन्नई, कोलकात्यासाठी सेवा व नवी दिल्लीसाठी आणखी एक विमान सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मनीष रावल, अध्यक्ष, निमा एव्हिएशन कमिटी