
कोहोर | वार्ताहर | Kohor
भक्ष्याच्या शोधात आलेल्या एका बिबट्याने (Leopad) मध्यरात्री थेट घरात प्रवेश केल्याची थरारक घटना पेठ तालुक्यातील (Peth Taluka) हरणगाव शिवारात घडली. मात्र, घरातील कुटुंबीयांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि वन विभागाच्या तत्परतेमुळे तब्बल चार तासांच्या थरारानंतर बिबट्याला सुखरूप जेरबंद करण्यात यशा आले आहे.
हरणगाव शिवारातील (Haran Gaon Area) मळ्यात राहणारे सुभाष रघुनाथ भरसट यांच्या घरात मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत एक बिबट्या शिरला. घरातील हालचालींमुळे बिबट्याची चाहूल लागताच भरसट कुटुंबीयांनी घाबरून न जाता अत्यंत धैर्याने घराचे दरवाजे आणि खिडक्या बाहेरून बंद केल्या. त्यामुळे बिबट्या घरातच बंदिस्त झाला आणि मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच हरणगावच्या सरपंच पल्लवी भरसट यांनी तातडीने वन विभागाशी (Forest Department) संपर्क साधला. माहिती मिळताच ननाशी वनपरिक्षेत्रातील महाजे राऊंडचा वन स्टाफ आणि नाशिकची विशेष रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. वन विभाग आणि रेस्क्यू टीमने अत्यंत कौशल्याने मोहीम राबवत पहाटे साडेचार वाजता बिबट्याला सुखरूप पिंजऱ्यात डांबले.
या पथकाने राबवली मोहीम
सदर यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन ननाशीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यात महाजे क्षेत्राचे वन परिमंडळ अधिकारी बी. डी. सूर्यवंशी, वनरक्षक श्रीमती डी. के. पठाण, कृष्णा गांगुर्डे, किरण दळवी, रेस्क्यू टीमचे अभिजित माहले, डॉ. हेमराज व त्यांची टीम, तसेच हरणगावचे पोलीस पाटील निवृत्ती पवार आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. बिबट्या सुखरूप जेरबंद झाल्याने भरसट कुटुंबीयांसह संपूर्ण हरणगाव परिसराने सुटकेचा श्वास सोडला आहे. वनविभागाच्या या तत्पर कारवाईबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.




