पिंपळगाव बसवंत | वार्ताहर | Pimpalgaon Baswant
जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिकांना दरदिवशी बिबट्यांचे दर्शन होत आहे. तर काही ठिकाणी लोकांवर हल्ले होत आहेत . त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच पिंपळगाव बसवंत येथे एका ऊसतोड मजुरावर दोन बिबट्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथील धनंजय गांगुर्डे यांच्या शिवारातील ४३२/१ या क्षेत्रातील ३० एकरमध्ये गेल्या एका महिन्यापासून ऊसतोडणी चालू होती. आज या ऊसतोडणीचा शेवटचा दिवस होता. सदर ऊसात दोन बिबटे लपल्याची कल्पना कोणत्याही ऊसतोड मजुराला नव्हती.
दरम्यान, अचानक आज (गुरुवारी) दुपारी बारा वाजेच्या सुमारास या दोन्ही बिबट्यांनी ऊसतोड कामगारावर हल्ला करत हाताला चावा घेतला. त्यामुळे त्यांच्या हाताचे हाड फॅक्चर झाले. यानंतर कामगारास तात्काळ पिंपळगाव बसवंत येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.




