Monday, June 24, 2024
Homeनाशिकमहायुतीचा नाशिकच्या जागेचा तिढा सुटला; हेमंत गोडसे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर

महायुतीचा नाशिकच्या जागेचा तिढा सुटला; हेमंत गोडसे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर

नाशिक | Nashik
गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीकडून नाशिकच्या जागेबाबत रस्सीखेच सुरु होती. ती आता संपली असून महायुतीकडून नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशिकच्या उमेदवारीबाबतचा अनेक दिवसांचा तिढा हा अखेर सुटला असून गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

- Advertisement -

तब्बल महिनाभरानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. हेमंत गोडसे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. अखेर आज महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार घोषीत करण्यात आला आहे.

हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. यासाठी त्यांनी अनेकदा वर्षा निवासस्थानी येऊन एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली, शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर ही उमेदवारी मिळाली. नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर भाजपाची प्रचंड ताकद आहे. शहरात ३ आमदार, नगरसेवक आहेत. त्यामुळे नाशिकच्या जागेवर भाजपाकडून दावा सांगितला जात होता. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळही नाशिकमधून येणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत. त्यांच्या नावाचीही बरीच चर्चा झाली. पण अखेर ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली.

श्रींकात शिंदेंच्या घोषणेने महायुतीत नाराजी
नाशिक दौऱ्यावर आलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यावरून महायुतीमध्ये नाराजी निर्माण झाली होती. तसेच हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली होती.

हेमंत गोडसे यांची कारकीर्द
हेमंत गोडसेंचा जन्म ३ ऑगस्ट १९७० चा आहे. हेमंत गोडसे हे नाशिकमधून मागील दोन टर्म खासदार राहिले आहेत. यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून ते नाशिकमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी सव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. गोडसेंचे वडील तुकाराम गोडसे हे लष्कराच्या एमईएस विभागात नोकरी करुन शेती करत होते. हेमंत गोडसेंच्या आई द्रौपदाबाई गावातील राजाकरणामध्ये सक्रीय होत्या. घर संभाळून त्या ग्रामपंचायतीच्या सदस्या म्हणून कार्यरत होत्या. गोडसेंची पत्नी अनिता गृहिणी असून त्यांना अजिंक्य आणि सागर अशी दोन मुले आहेत. यंदा गोडसेंना तिसऱ्यांदा खासदारकीसाठी संधी देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या