नाशिक | Nashik
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरवात झाली आहे. नाशिकसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठीही आज तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्या, माकपचे माजी आमदार जे पी गावित व सुभाष चौधरी यांनी दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
नाशिक जिल्ह्यतील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना भाजपने पहिल्याच यादीमध्ये उमेदवारी जाहीर केली होती. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरीची जागा माकपला सोडावी, अशी मागणी माजी आमदार गावितांकडून करण्यात आली होती. मात्र, ऐन वेळी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांना उमेदवारी मिळाल्याने गावित नाराज झाले होते. याबाबत, त्यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवत उमेदवार बदलावा अशी मागणीही केली होती. मात्र, शरद पवार गटाकडून अद्याप त्यांच्या मागणीचा विचार करण्यात आला नाही. काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही गावित यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, गावित हे त्यांच्या मागणीवर ठाम राहीले.
त्यानंतर, आज जे पी गावीत यांनी पहिल्याच दिवशी दिंडोरी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गावित यांनी आपल्या सहकारी आणि समर्थकांसह नाशिक शहरातून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निमित्ताने माकपचे शक्तिप्रदर्शनदेखील झाले आहे. या शक्तिप्रदर्शनामुळे दिंडोरी मतदारसंघात जोमात असलेल्या महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे. आता दिंडोरी लोकसभेची निवडणुक चौरंगी होणार की जे पी गावित आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी
माकपने महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा देत जातियवादी संघटनांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धार केला होता, त्या दृष्टीने मविआचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला त्यांनी पाठिंबा दिल्याचे प्रत्यक्ष भेटून जाहीर केले होते, त्यांनी केवळ दिंडोरी लोकसभेच्या जागेची मागणी ठेवली होती, मात्र महाविकास आघाडीने उमेदवार दिल्याने माकपाने सवता सुभा उभारला आहे त्यामुळे राज्यातील ईतर निवडणुकांमध्ये माकपची किती साथ मिळेल याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.