नाशिक | Nashik
आज देशात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदार संघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. त्यातच, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी, आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात अर्ज विक्री आणि दाखल करता येणार असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारिख ३ मे पर्यंत असणार आहे.
नाशिकचा तिढा कधी सुटणार?
लोकसभा निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडत असला तरीही नाशिक लोकसभेचा महायुतीतील तिढा अद्यापही कायम आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, महायुतीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झाला नसल्याने या जागेवर कोण लढणार याबाबतचा तिढा कायम आहे. महायुतीतील तिनही पक्षांनी नाशिकच्या जागेवर दावा केला असल्याने गोंधळ वाढला आहे. त्यातच नाशिकच्या जागेसाठी आजपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरवात झाली असल्याने महायुती आपला उमेदवार कधी जाहीर करणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
दिलीप खैरेंनी नेला अर्ज
काही दिवसांपुर्वी अजित पवार गटाचे उमेदवार छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. आज मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासाठी त्यांचे बंधू अंबादास खैरे यांनी अर्ज घेतला आहे. ही छगन भुजबळांची मोठी खेळी असल्याचं बोललं जात आहे. गुरवारी नाशिकमध्ये झालेल्या बैठकीमध्येही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना निवडणूकीतून माघारी परत घ्यायची विनंती केली आहे. त्यातच आज दिलीप खैरेंचे बंधू अंबादास खैरे यांनी अर्ज नेल्यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठा ट्विस्ट बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीकडून नाशिक लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार हे अद्यापही निश्चित झाले नसले तरी महायुतीच्या नेत्यांकडून अर्ज घेण्यास सुरवात झाली असल्याने नाशिकच्या वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.