Saturday, July 27, 2024
HomeनाशिकVideo : मंगळागौरीच्या निमित्ताने जिम पोरी झिम; आजपासून रंगणार महिनाभर खेळ

Video : मंगळागौरीच्या निमित्ताने जिम पोरी झिम; आजपासून रंगणार महिनाभर खेळ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

श्रावण महिन्यातील मंगळागौर पूजन आणि खेळ रंगायला सुरुवात झाली आहे. श्रावणातील महिनाभर मंगळागौरीचे खेळ खेळले जाणार आहेत. नवविवाहिता पहिली ५ वर्षे मंगळागौरीचे व्रत करतात. श्रावणातील प्र्त्येक मंगळवारी तिचे पूजन करतात. पूर्वी जिच्या घरी पूजा असायची तिच्या घरी महिला जमायच्या. रात्रभर जागरण करून खेळ खेळले जायचे….

- Advertisement -

तथापि बदलत्या काळानुसार मंगळागौरीच्या खेळांचेही स्वरूप बदलले आहे. आता रात्रभर जागरण क्वचितच केले जाते. ४-५ तास खेळ खेळले जात आहेत. यंदा करोनामुळे जाहीर कार्यक्रमांची संख्या कमीच झाली आहे. तरीही निर्बंध पाळून काही ठिकाणी खेळ रंगणार आहेत असे प्राची कुलकर्णी यांनी सांगितले. त्या आणि त्यांच्या मैत्रिणी गेली २० वर्षे मंगळागौरीच्या खेळाचे कार्यक्रम करतात.

५० पेक्षा जास्त खेळ!

मंगळागौरीचे ५० पेक्षा जास्त खेळ आहेत. त्यात १५-१६ प्रकारच्या फुगड्या आहेत. होडी, गोफ, रुणझुणत्या पाखरा, झिम्मा, तामतवली, नाच ग घुमा, खुर्ची का मिरची, कोंबडा, लाट्या बाई लाट्या, आगोटं-पागोटं, आळुंकी-साळुंकी, आवळा वेचू की कवळा वेचू, किकीचे पान, नखोल्या, ताक, काच-किरडा अशा अनेक खेळातून सासर-माहेरच्या विविध नात्यांचे पदर उलगडण्याचा प्रयत्न केला जातो.

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती असायची. महिला दिवसभर घरातच असायच्या. त्यांना फारशी मोकळीक नसायची. मन मोकळे करण्याची संधीही नसायची. ती संधी त्यांना मिळावी हाच कदाचित विचार हे खेळ खेळण्यामागे आणि जागरण करण्यामागे असावा. आता कदाचित सामाजिक संदर्भ बदललेही असतील. पण मंगळागौरीची परंपरा मात्र पुढे सुरू आहे. आणि ती सुरु राहावी हाच खेळ सादर करण्यामागचा उद्देश आहे.

गाण्यांना नवे सन्दर्भ !

या खेळात नात्यांचे पूर्वीच्या काळातील सन्दर्भ अनेक ठिकाणी आहेत. सास-सुनेचे भांडण आहे. नवराबायकोचे प्रेम आहे. उदाहरणार्थ एक गाणे आहे. सासूचे धुणे..खुसूखुसू.. सासऱ्याचे धुणे.. खुसूखुसू.. असे घरातील सर्व सदस्यांचे नाव घेतल्यावर ती म्हणते पतिदेवांचे धुणे..

आहाहा..असे म्हणत पतिदेवाचे कपडे एकदम प्रेमाने धुते. काही गाण्यांना नवे सन्दर्भ देण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ ‘केरसुणीने केर काढण्याची कोण बाई झंझट, बटन दाबताच व्हॅक्युम क्लिनर काम करतो पटापट’ पारंपरिक खेळांमध्ये असे बदल केले जात असल्याने नवीन पिढी देखील मंगळागौरीच्या खेळाशी जोडली जात आहे. तरुण मुली देखील नटूनथटून या खेळात सहभागी होऊ लागल्या आहेत.

सर्वांगीण व्यायाम!

मंगळागौरीचे सगळे खेळ म्हणजे महिलांसाठी सर्वांगीण व्यायामच आहे. पायाच्या अंगठ्यापासून केसांपर्यंतचा व्यायाम प्रत्येक खेळात होतो. श्रावणाच्या आधी महिनाभर या खेळांचा सराव केला जातो. गेल्या काही वर्षांपासून फक्त खेळ शिकणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. हौशेने महिला सरावाला महिनाभर उपस्थित राहू लागल्या आहेत. या खेळांमुळे होणारा व्यायाम लक्षात घेता मंगळागौरीच्या सर्वच खेळांचे वर्णन ‘जिम पोरी झिम’ असे केले तर ते वावगे ठरणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या