नाशिक | Nashik
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सरशी झालेली असली तरी प्रथमच निवडून येणाऱ्यांच्या सर्वाधिक संख्येची परंपराही यंदा पाळली गेली आहे. तब्बल ६५ उमेदवार (Candidate) हे प्रथमच राजीव गांधी भवनची पायरी चढणार आहेत. अत्यंत चुरशीतही सुमारे ४५ जणांनी पुन्हा निवडून येण्याची करामत दाखवली आहे. त्यामुळे काही नगरसेवक ‘ब्रेक के बाद’ पालिकेत प्रवेश करणार आहेत. प्रत्येक निवडणुकीत साधारण पन्नासहून अधिक नवागतांचा पालिकेत प्रवेश होत असल्याचे दिसते.
हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर
यंदा एकूण संख्येच्या निम्म्याहून अधिक नगरसेवक प्रथमच निवडून आलेले आहेत. निवडून आलेले काही जण हे वारसाहक्काने आल्याचे दिसते. म्हणजेच गेल्यावेळी निवडून आलेले पण यंदा आरक्षणामुळे अडचण झालेल्यांनी कुटुंबातील सदस्यालाउतरविले होते. अशांचीही संख्या मोठी आहे. मुस्लीम नगरसेवकांची संख्या एकने घटलेली दिसते. मनसे, राष्ट्रवादी अजित पवार तसेच शिवसेना उबाठा यांच्या सदस्य संख्येतही लक्षणीय घट झाली. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, आरपीआय आठवले गट, वंचित बहुजन, समाजवादी पक्ष, माकप, आप आदी काही पक्षांना (Party) भोपळाही फोडता आलेला नाही. केवळ एकच अपक्ष विजयी झाला हादेखील विक्रमच आहे.
हे देखील वाचा : Nashik MC Election : महाजन ठरले ‘सुपर हिरो’, मालेगावात भुसेच ‘दादा’
दरम्यान, रंजना भानसी, दिनकर पाटील, शाहू खैरे, सुधाकर बडगुजर, रंजना बोराडे, चंद्रकांत खोडे, गुरुमित बग्गा, अजय बोरस्ते, हेमलता पाटील असे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच नगरसेवक अनेकदा विजयी झाल्याने अनुभवी आहेत. माजी महापौर अशोक मुर्तडक व माजी महापौर यतीन वाघ यांच्या सौभाग्यवती हितेश, ज्येष्ठ नगरसेवक संभाजी मोरुस्कर, अरुण पवार, शिवाजी गांगुर्डे आदींना पराभवाचा धक्का बसला आहे.
महिला आरक्षण ५० टक्के; प्रतिनिधित्व मात्र ५५ टक्के
महिलांसाठी ५० टक्के म्हणजे जागा राखीव असतानाही यंदा पालिकेत तब्बल ६७ महिलांचा प्रवेश झाल्याने खऱ्या अर्थाने महिलाराज येऊ घातले आहे. १२२ पैकी ६१ जागा महिलांसाठी राखीव होत्या. त्याव्यतिरिक्त आणखी सहा महिला निवडून आल्या आहेत. खुल्या जागांवर उभ्या राहिलेल्या या महिलांना पुरुषांपेक्षाही मतदारांनी अधिक पसंती दिल्याचे स्पष्ट आहे. महिलांचे राजकारणातील स्थान जनतेने अधिक प्रमाणात स्वीकारल्याचे यातून मानता येईल. प्रभाग १, प्रभाग ८, प्रभाग ११, प्रभाग १४, प्रभाग १६ आणि प्रभाग २३ मधील खुल्या जागांवर महिलांनी विजयाचा झेंडा फडकावला आहे. प्रभाग १ मध्ये दीपाली गिते, प्रभाग ८ मध्ये उषा बेंडकोळी, प्रभाग ११ मध्ये सविता काळे, प्रभाग १४ मध्ये जागृती गांगुर्डे, प्रभाग १६ मध्ये आशा तडवी आणि प्रभाग २३ मध्ये संध्या कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या प्रवर्गाच्या खुल्या जागांवर बाजी मारली आहे.





