Saturday, January 17, 2026
HomeनाशिकNashik MC Election : महाजन ठरले 'सुपर हिरो', मालेगावात भुसेच 'दादा'

Nashik MC Election : महाजन ठरले ‘सुपर हिरो’, मालेगावात भुसेच ‘दादा’

नाशिक । शैलेंद्र तनपुरे- दै. देशदूत संपादक | Nashik

आयाराम, गुन्हेगारांना पक्षात प्रवेश दिल्यावरून पक्षासह नाशिककरांच्या (Nashik) टीकेचे धनी झालेल्या मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे डावपेच हेच अखेर सरस ठरल्याने नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला. गिरीश महाजन हे केवळ संकटमोचकच नव्हे तर ते सुपर हिरो देखील असल्याचे निकालाने स्पष्ट झाले. मालेगावात इस्लाम पार्टीने विजय मिळविला असला तरी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शहरातील आपल्या होमग्राऊंडवर अभूतपूर्व विजय मिळवत आपली कलाकारी पुन्हा एकदा सिद्ध केली.

- Advertisement -

नाशिक महापालिकेत (Nashik NMC) यंदा भाजप मार खाणार व शिवसेनेची सरशी होणार असे वातावरण होते. भाजपने स्वपक्षीय आमदारांनाही दुखवून इतर पक्षातून आयात कैलेले उमेदवार, गुन्हेगार व त्यांच्या कुटुंबीयांना दिलेली संधी, बंडखोरी तसेच तपोवन वृक्षतोड प्रकरणी घेतलेली वादग्रस्त भूमिका यावरून पक्षाच्या सहानुभूतीदारांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता यामुळे यंदा भाजपला फटका बसणार असेच वातावरण होते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने देखील आयत्यावेळी इतर पक्षातील मातब्बर उमेदवारांना दिलेली संधी व त्या जोरावर भाजपला दिलेली कट्टर टक्कर यामुळे त्यांना नाशिककर पसंती देतील असा अंदाज होता. परंतु भाजपने सर्वच अंदाज फोल ठरवित विजय तर खेचून आणलाच; शिवाय सलग दुसऱ्यांदा स्वबळावर बहुमत मिळविण्याचा पराक्रमही करून दाखविला आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

नाशिक महानगराच्या सर्व सहाही विभागात भाजपला (BJP) चांगले यश मिळाले. विशेषतः, त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पंचवटी विभागात यंदा शिवसेनेने बरीच घुसखोरी केलेली असल्यामुळे काहीतरी गडबड होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात तेथेही २४ पैकी २१ जागा खिशात घालून भाजपने शिवसेनेला एकापरीने धोबीपछाड दिला आहे. अर्थात, शिवसेनेने देखील सगळ्या विभागात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने किमान खाते तरी खोलले; पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुपडासाफ झाला. पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी आपल्याला पुतण्याला भाजपमध्ये पाठवून काही संकेत दिले होतेच, मतदानानंतर लागलीच त्यांनी पदाचा राजीनामा देऊन पुढील वाटचाल स्पष्ट केली. अर्थात, पक्षाच्या वरिष्ठांनी केलेले दुर्लक्ष याविषयीची त्यांची नाराजीही रास्त होती.

काँग्रेसला (Congress) जुन्या नाशिकमध्ये माफक यश मिळाले. काँग्रेसच्या नेत्यांनी देखील राष्ट्रवादीप्रमाणेच नाशिकला सायडिंगला टाकले असतानाही मुस्लीम बांधवांच्या जोरावर यश मिळाले. उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसे यांच्या युतीचाही भ्रमनिरास झाला. दोघा भावांची नाशिकमधील सभा जबरदस्त झाल्यानंतर काही अपेक्षा निर्माण झाली होती. परंतु दोन्ही पक्षांचे संघटन पक्षांतराच्या सुनामीमुळे एवढे विसविशीत झालेले आहे की त्यांना अनेक ठिकाणी चांगले उमेदवार तर मिळाले नाहीतच, शिवाय मतदारांपर्यंत पोहोचणेही शक्य झालेले नाही. मनसेला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. भाजपच्या विजयाचे खरे शिल्पकार हे गिरीश महाजन आहेत, हे निकालाने सिद्ध केले. गिरीश महाजन व स्थानिक आमदार यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी झाल्या होत्या. इतर पक्षांमधून नेत्यांना प्रवेश घेताना आमदारांनी केलेल्या प्रखर विरोधामुळे शहरातील वातावरणही बिघडले होते. तपोवन प्रश्नी महाजन यांना बदनाम करता येईल, या उद्देशाने पक्षातीलच काही मंडळी आंदोलकांना खतपाणी घालत असल्याचा आरोप होत होता. विरोधकांनीही महाजन यांनाच टीकेचे लक्ष्य ठरविले होते.

राज व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तर त्यांची संभावना लाकूडतोड्या अशी करून हे पार्सल जळगावला परत पाठवा, असे जाहीर आवाहन नाशिककरांना केले होते. स्थानिक आमदार व काही नेते यांनी उमेदवार निवडीच्या वेळीही जवळच्या माणसांसाठी हट्ट धरले. त्यामुळेही काही जागा गमावण्याची वेळ आली. अशा प्रतिकूल परिस्थितीत महाजन यांनी अक्षरशः एकहाती किल्ला लढविला. दिनकर पाटील, सुधाकर बडगुजर, शाहू खैरे, विनायक पांडे आदींना पक्षात घेण्यावरून झालेले घमासान व नंतर एबी फॉर्म वितरणप्रसंगी झालेला अभूतपूर्व राडा यामुळे भाजपच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा सगळ्या नकारात्मक वातावरणात भाजपने सत्ता राखली, हा चमत्कार म्हणावा लागेल.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर भाजपला संधी दिली तर विकासाची प्रक्रिया बिनधोक राहील, अशी भावना कदाचित सामान्य नाशिककरांची झालेली दिसते. त्यामुळेच नाशिककरांनी मतदानाचा टक्का वाढविण्यात कुचराई केलेली असली तरी भाजपला भरभरून मतदान करण्यात मात्र कोणतीही कंजुषी दाखविलेली नाही. मालेगाव महानगरपालिकेत एमआयएम व इस्लाम पार्टी यांच्यातच खरी लढत होती. तरीही हिंदुबहुल सहा प्रभागातील तब्बल १८ जागा पटकावून शिवसेनेने दादा भुसेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. भाजपने येथे स्वतंत्र निवडणूक लढविली खरी; परंतु आयत्यावेळी पक्षात घेतलेल्या काही नेत्यांच्या हट्टामुळे युती होऊ शकली नाही. त्याचा फटका भाजपला तर बसलाच; पण दादा भुसेंच्या नेतृत्वाची चमक त्याचमुळे अधिक चमकदार ठरली. दादा भुसेंना गावातच जेरबंद करण्यासाठी मध्यंतरी अद्वय व अपूर्व हिरे बंधू, बंडुकाका बच्छाव आदी त्यांच्या विरोधकांना पक्षात घेऊन त्यांना बळ देण्याचा प्रयत्न भाजपने केला खरा पण दादा भुसे सर्वांनाच भारी ठरले.

ताज्या बातम्या

महापालिका निवडणुकीत भाजपला जनादेश

0
मुंबई वार्तापत्र | उद्धव ढगे-पाटील Mumbai मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या गेलेल्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला जनादेश मिळाला आहे. २९ पैकी २५...