नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महानगरपालिकेची निवडणूक (NMC Election) चांगलीच रंगतदार ठरली. यंदाच्या निवडणुकीत राजकीय लढत ही पक्षांपुरती मर्यादित न राहता थेट नात्यागोत्यांमध्येच अडकली होती. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे जणू ‘नात्यागोत्यांचा भरलेला मेळा’च ठरली. तब्बल एक डझनहून अधिक म्हणजेच नात्यातील १४ कुटुंब निवडणूक रिंगणात होते. मात्र, यातील एक डझन नात्यागोत्याला मतदारांनी (Voter) नाकारले. यात चुंभळे, खैरे, पाटील, बडगुजर, लोंढे, दातीर आदी कुटुंबांचा समावेश आहे. यामध्ये दिवे व महाले ही दोन कुटुंबेच यशस्वी ठरली.
हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर
राजकारण आणि घराणेशाही यांचा अतूट संबंध आता नवीन राहिलेला नाही. एकीकडे राजकीय पक्ष घराणेशाहीवर टीका करत असतानाच, दुसरीकडे स्वतःच्याच पक्षांमध्ये नात्यांना उमेदवारी देत घराणेशाहीला खतपाणी घातले जात असल्याचे यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीतून ठळकपणे समोर आले. मागील अनेक निवडणुकांमध्ये नात्यांमधील लढती पाहायला मिळाल्या असल्या तरी, यंदा मात्र एक डझनहून अधिक नातेसंबंधातील उमेदवार (Candidate) थेट निवडणूक रिंगणात उतरले होते. भावाभावांमधील थेट लढत हे यंदाच्या निवडणुकीचे मोठे वैशिष्ट्य ठरले. भाऊ-भाऊ, पती-पत्नी, काका-पुतणे, दीर-भावजयी, नणंद-भावजयी, सासरे-सून, मामा-भाचे एवढेच नव्हे तर मेहुण्याची पत्नीही निवडणूक रिंगणात उतरविल्याने नाशिक मनपाचा निवडणूक आखाडा राजकीय नात्यागोत्यांचा रंगला.
हे देखील वाचा : Nashik Crime : निवडणुकीतील पराभवानंतर वसूलीसाठी राडा; शिंदे सेनेच्या पदाधिकार्यासह साथीदारांवर दरोडा, खंडणीचे गुन्हे
विशेष म्हणजे काही ठिकाणी ही नाती थेट समोरासमोर शड्डू ठोकत एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिल्याने अशा लढती अधिकच रंगतदार ठरल्या. निवडणुका म्हटलं की, राजकारण. हे राजकारण राजकीय लोकांच्या कुटुंबाभोवतीच फिरते ही बाब आता काही नवीन राहिलेले नाही. त्यामुळे सार्वजनिक निवडणुकांमध्ये नात्यागोत्यातच निवडणुका आणि राजकारणाचा आलेख अलीकडच्या काळात वाढू लागला आहे. मागे वळून पाहताना ज्या ज्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत. त्या ठिकाणी नात्यांमधील निवडणूक ही बोटावर मोजण्या इतकीच झाल्याचे उदाहरण आहे. यामध्ये भाऊ-भाऊ, काका-पुतणे, सासू-सासरे असे एकत्रित लढल्याचे वा समोरासमोर लढण्याचे उदाहरणे फार क्वचित आहेत. यंदाच्या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम हे शिवसेनेकडून (Shivsena) तर दशरथ पाटील यांचे बंधू माजी ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांचे चिरंजीव अमोल हे भाजपाकडून रिंगणात उतरत त्यांनी थेट एकमेकांनाच आव्हान दिले.
हे देखील वाचा : Nashik Politics : महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळताच भाजप शहराध्यक्षांनी शिंदे सेनेला डिवचलं; म्हणाले, “आता त्यांनी विरोधी…”
निवडणूक रिंगणात उतरलेले नातेसंबंधातील उमेदवार
- माजी नगरसेवक राहुल दिवे (शिवसेना) व माजी नगरसेवक प्रशांत दिवे (भाजप) हे दोघे भाऊ-भाऊ वेगवेगळ्या प्रभागातून आणि पक्षाकडून लढले आणि दोघेही यशस्वी झाले.
- तसेच राजेंद्र महाले (भाजप) पूनम महाले (शिवसेना) हे दीर-भावजयी देखील वेगवेगळ्या प्रभागातून आणि पक्षाकडून लढले आणि दोघेही यशस्वी झाले.
- माजी नगरसेवक शाहू खैरे माजी नगरसेविका वत्सला खैरे (दिर-भावजयी) हे दोघे एकाच प्रभागात वेगवेगळ्या पक्षांकडून लढले. यात वत्सला खैरे यांचा पराभव झाला.
- प्रेम पाटील-अमोल पाटील (भाऊ-भाऊ) प्रेम शिवसेनेकडून तर अमोल भाजपकडून एकमेकांसमोर लढले. यात प्रेम पाटील यांचा भावाकडून पराभव झाला.
- माजी नगरसेवक दिलीप दातीर-दीपक दातीर (काका-पुतणे) हे वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक रिंगणात होते. यात दिलीप दातीर यांचा पराभव झाला.
- मनसेचे माजी नगरसेवक सलीम (मामा) शेख फरीदा शेख (पती-पत्नी) हे वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक रिंगणात होते. या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
- माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करून आपल्यासह पुत्र दीपक बडगुजर यांनाही उमेदवारी मिळविण्यात यश मिळविले खरे. मात्र, पुत्र दीपक यांचा राजकारणातील श्रीगणेशा करण्यात त्यांना अपयश आले.
- माजी महापौर विनायक पांडे यांनीही भाजपात प्रवेश करत सून आदिती ऋतुराज पांडे हिस उमेदवारी मिळवली. शिवाय पुतणी शिवानी चंद्रकांत पांडे यांना उबाठाकडून उमेदवारी मिळविल्याने शिवानी व आदिती या ननंद-भावजयी निवडणूक रिंगणात होत्या. मात्र शिवानीला पराभव पत्करावा लागला.
- शाहू खैरे आणि माजी नगरसेवक संजय चव्हाण मामा-भाचे हे एकाच प्रभागातून मात्र वेगळ्या गटातून निवडणूक रिंगणात होते. यात चव्हाण यांचा पराभव झाला.
- माजी नगरसेविका कल्पना चुंभळे व कैलास चुंभळे या काकू पुतण्याला पराभवाचा सामना करावा लागला.
- टिंकू उर्फ नितीन खोले-ज्योती खोले हे दीर-भावजयी पराभूत झाले.
- माजी नगरसेवक, शिवसेनेना (उबाठा) डी. जी. सूर्यवंशी व त्यांची पत्नी माधवी सूर्यवंशी या दाम्पत्याचाही पराभव झाला.
- माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि माजी नगरसेविका दीक्षा लोंढे या सासरा व सूनेलाही मतदारांनी नाकारले.
- शिवसेनेचे शरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्या मेव्हण्याची पत्नी असलेल्या अक्षदा पांगरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.




