नाशिक | Nashik
महापालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी गुरुवार (दि.१५) रोजी ५६.७६ टक्के मतदान झाले होते. यानंतर शुक्रवार (दि.१६) रोजी मतमोजणी झाली असता यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महापालिका निवडणुकीत भाजपला तब्बल ७२ जागांवर विजय मिळाला असून, त्या खालोखाल शिंदेंच्या सेनेला २६ जागा मिळाल्या आहेत. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेला १५, काँग्रेसला ०३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ०४, मनसेला एक आणि अपक्ष उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे. त्यामुळे आता वरील जागांची संख्या बघता नाशिक महापालिकेत भाजपचा महापौर बसणार हे निश्चित झाले आहे.
२०१७ मध्ये ६१.६० टक्के मतदान (Voting) झाले होते यात यंदा सुमारे ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. यंदाचा निकाल अनेक दिग्गजांना धक्का देणारा ठरला आहे. कारण महापालिकेच्या अनेक प्रभागांतील लढती अत्यंत लक्षवेधी ठरल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत १२२ पैकी पाच जणांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला तर पाच जणांचा अगदी कमी मतांनी पराभव झाला.
हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर
सर्वात जास्त मतांनी निवडून (Won) आलेल्यांमध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर यांचा समावेश आहे. त्यांना एकूण १९ हजार ८३४ इतकी मते मिळाली असून, त्यांचा १४ हजार ८६४ मतांनी विजय झाला आहे. तर गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक गणेश गीते यांच्या पत्नी दिपाली गीते या ११ हजार ३१५ मतांनी निवडून आल्या असून, त्यांना एकूण १३ हजार ३७६ इतकी मते पडली. तसेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेतून भाजपमध्ये गेलेले दिनकर पाटील हे देखील ९ हजार ४४३ मतांनी विजयी झाले असून, त्यांना १३ हजार ३७६ इतकी एकूण मते मिळालेली आहेत. तर भाजपचे गौरव गोवर्धने हे देखील ९ हजार ०१८ मतांनी निवडून आले असून, त्यांना एकूण १६ हजार ७२९ इतकी मते पडली आहेत. याशिवाय भाजपच्या ऐश्वर्या लाड या सुद्धा ८ हजार ९१० मतांनी विजयी झाल्या असून, १४ हजार ७९९ एवढी त्यांना एकूण मते मिळालेली आहे.
दुसरीकडे प्रभाग क्रमांक २८ ब मधून शिंदे सेनेच्या शीतल भामरे यांचा अवघ्या १८० मतांनी पराभव झाला असून, येथून भाजपच्या प्रतिभा पवार यांचा निसटता विजय झाला आहे. प्रभाग क्रमांक ८ ड मधून शिंदे सेनेचे विलास शिंदे २८४ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी भाजपच्या प्रवीण पाटील यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक ३० ड मधून शिंदे सेनेचे सागर देशमुख यांचा ३२४ मतांनी पराभव झाला असून, त्यांच्याविरुद्ध भाजपचे अजिंक्य साने निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक २१ ब मधून भाजपच्या नितीन खोले यांचा शिंदे सेनेच्या रमेश धोंडगे यांनी ३५८ मतांनी पराभव केला आहे.तर प्रभाग क्रमांक २७ ब मधून भाजपच्या ज्योती कवर यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या किरण राजवाडे यांनी ३४८ मतांनी पराभव केला आहे.
दिग्गजांना पराभवाचा धक्का
यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २९ मधील लढत अत्यंत लक्षवेधी ठरली. या प्रभागातील ‘अ’ गटातून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी भाजपचे सुधाकर बडगुजर यांच्या मुलाचा पराभव केला. त्यामुळे पहिल्यांदाचा राजकारणाचा श्री गणेशा करणाऱ्या दीपक बडगुजर यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. याशिवाय माजी महापौर अशोक मुर्तडक, यतीन वाघ, सुनील बागुल यांचे पुत्र मनीष बागुल, ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख डी.जी.सूर्यवंशी, आमदार सीमा हिरेंचे दीर योगेश हिरे यांनाही पराभव पत्करावा लागला.




