पंचवटी | प्रतिनिधी | Panchavti
महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस अत्यंत नाट्यमय ठरला. प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपामधून (BJP) बंड करून उभ्या असलेले माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांचा अर्ज मागे घ्यावा, यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र नियोजित वेळ संपल्याने त्यांची अपक्ष उमेदवारी कायम राहिली असून, भाजपा अधिकृत उमेदवार मच्छिंद्र सानप यांच्या मतांत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रभाग तीनमधून भाजपाने माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे रुची कुंभारकर यांनी अपक्ष म्हणून नामांकन दाखल केले होते. सानप यांना एबी फॉर्म मिळाल्यानंतर इतर उमेदवारांना माघारी घ्यावी, यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू झाले. त्यामध्ये कुंभारकर यांचाही समावेश होता. शुक्रवारी सकाळपासून त्यांची सतत समजूत काढण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांचा ठाम विरोध असल्यामुळे निर्णय पुढे ढकलला जात होता.
दरम्यान, माघारीची वेळ संपायला थोडाच अवधी असताना सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कुंभारकर यांना विभागीय कार्यालयात आणले. यावेळी एका कार्यकर्त्याने मोठ्याने आक्षेप नोंदवत “भाऊ, माघार घेऊ नका; ते घाबरले आहेत,” अशी प्रतिक्रिया दिल्याने वातावरण तापले. या प्रकारामुळे कुंभारकर भावूक झाल्याचेही दिसून आले. नंतर सानप यांनी त्यांना कार्यालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला; परंतु जिन्यात असतानाच माघारीची अधिकृत वेळ संपल्याची घोषणा झाली.
त्यानंतर पोलिस (Police) आणि कर्मचाऱ्यांना विनंती करूनही कार्यालयाचे दार उघडण्यात आले नाही, आणि कुंभारकर समर्थकांसह परतले.यामुळे आता रुची कुंभारकर अपक्ष उमेदवार म्हणूनच रिंगणात राहणार असून, मच्छिंद्र सानप यांच्यासमोर मतविभागणीचे संकट अधिक गडद झाले आहे.माघारी अर्जाचा अखेरचा दिवस असल्याने विभागीय कार्यालयात मच्छिंद्र सानप आणि अशोक मुर्तडक समोरासमोर आले, त्यावेळी मुर्तडक यांनी थेट टिप्पणी करत “तुमचं घेतलं आणि आमचंच कापलं !” अशी खंत व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
‘तुमचं घेतलं आणि आमचंच कापलं!’
माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करताच, पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी त्यांना खात्री वाटत होती. मात्र माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी आपल्या सुपुत्राला तिकीट मिळवून देताना मुर्तडक यांच्या राजकीय आकांक्षांवर पाणी फेरले, अशी चर्चा आहे.




