नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा जमीन फसवणूक (Mhada Land Fraud) प्रकरणात अटकेच्या भितीने धास्तावलेल्या ४५ पेक्षा अधिक संशयितांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. या सर्व अर्जांवर २० मार्च रोजी सुनावणी (Hearing) होणार होती, मात्र न्यायालयाने ती २३ मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. प्रकरणाची व्याप्ती मोठी असून संशयितांची संख्याही लक्षणीय आहे.
अर्जांची संख्या पंचेचाळीसच्या पार गेल्याने आणि संबंधित कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यासाठी वेळ आवश्यक असल्याने, न्यायालयाने (Court) सर्व अर्जांची एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय झाल्याचे समजते. यामुळे जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या संशयितांची धाकधूक वाढली असून त्यांना आता आणखी तीन दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या भूखंडांचे बेकायदेशीरपणे तुकडे पाडून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप या संशयितांवर आहे..
दरम्यान, येत्या काही दिवसांत आणखी काही बड्या बांधकाम व्यावसायिकांवर (Professionals) अटकेची टांगती तलवार आहे. २३ मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय या संशयितांना दिलासा देणार की त्यांचे जामीन अर्ज फेटाळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
मुद्दे
- ‘हॅप्पी होम’चा संचालक सोनू मनवानीच्या पोलीस कोठडीत २३ मार्चपर्यंत वाढ.
- आतापर्यंत ४५ हून अधिक संशयितांकडून अर्ज दाखल
- सर्व अर्जांवर आता २३ मार्च रोजी एकत्रित सुनावणी
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या भूखंडांची विल्हेवाट लावल्याचा आरोप;
- मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता




