नाशिक | Nashik
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे ६ आणि ७ ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) येत आहे. दौऱ्याची सुरुवात गुरुवारी (६ ऑगस्ट) सकाळी मुंबई नाका येथे राज ठाकरे यांच्या स्वागताने होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह येथे शाखाध्यक्षांची बैठक होईल.
सकाळी ११ वाजता नाशिक ग्रामीणमधील १५ तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक (Meeting) व फेरनियुक्तीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१५ वाजता बूथ लेव्हल एजंट (बीएलए) आणि २०२६ च्या महापालिका निवडणुकीतील उमेदवारांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी २.३० वाजता शहर कार्यकारिणी, महिला सेना, विद्यार्थी सेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे हे प्रथमच नाशिकमध्ये येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाशी युती करून मनसेने महापालिका निवडणूक लढविली होती. यामध्ये त्यांना एका जागेवर यश मिळाले होते. तर इतर जागांवर मनसेचा पराभव झाला होता. त्यामुळे आता राज ठाकरेंकडून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यात निवडणुकीतील पराभवाची कारणमिंमासा, कुंभमेळा कामांमुळे नाशिकमध्ये निर्माण झालेली स्थिती याचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.




