नाशिक | Nashik
संयुक्त राष्ट्रांच्या ८१ व्या आमसभेत (UNGA 2026) भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झालेले नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांचा ५ दिवसांचा अमेरिका दौरा यशस्वीपणे संपन्न झाला. न्यूयॉर्क येथील भारतीय (India) वाणिज्य दूतावासाच्या (CGI New York) वतीने आयोजित भारतीय-अमेरिकी समुदायासोबतच्या संवादाने या महत्त्वपूर्ण दौऱ्याची सांगता झाली. या दौऱ्यादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च व्यासपीठावर ‘विकसित भारत २०४७’ चा दृष्टिकोन आणि भारताची भूमिका त्यांनी जगासमोर प्रभावीपणे मांडली.
पाच दिवसांच्या दौऱ्यातील महत्त्वपूर्ण टप्पे
महात्मा गांधींच्या स्मारकास अभिवादन
खासदार वाजे यांनी पहिल्या दिवशी संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या स्मारकास अभिवादन करून कामकाजाची सुरुवात केली. यानंतर समिती सदस्यांसोबत आगामी कामकाजाची रूपरेषा निश्चित केली.
‘सोशल डेव्हलपमेंट’ चर्चेत भारताची विकासगाथा
दुसऱ्या दिवशी खासदार वाजे यांनी आमसभेच्या ‘थर्ड कमिटी’ (Third Committee) मध्ये “Social Development” विषयावर बोलताना भारताचे डिजिटल समावेशन, अन्नसुरक्षा, आरोग्य व्यवस्था, परवडणारी घरे आणि गरिबी निर्मूलन या क्षेत्रांतील उल्लेखनीय यश जगासमोर मांडले.
शाश्वत विकासावर (SDGs) उच्चस्तरीय चर्चा
UNDP च्या आशिया-पॅसिफिक प्रादेशिक संचालक कन्नी विग्नाराजा यांच्याशी भेट घेऊन भारतातील शाश्वत विकासाची उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्यात खासदारांच्या भूमिकेवर विचारविनिमय करण्यात आला. तसेच, ‘UN Diplomatic Spouses Club’ च्या उद्घाटन कार्यक्रमालाही खासदार राजाभाऊ वाजे यांनी हजेरी लावली.
भारत-फ्रान्स संबंध, AI आणि जागतिक कापूस दिन
डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), UNICEF सोबत बाल आरोग्य व शिक्षण, आणि सुरक्षा परिषदेतील भारताचे कायमस्वरूपी सदस्यत्व यावर विविध देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. तसेच, ‘जागतिक कापूस दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात शाश्वत कापूस उत्पादन आणि महिला सक्षमीकरणावर त्यांनी चौथ्या दिवशी संवाद साधला.
UN80 सुधारणा आणि हिंदी दिवस सोहळा
संयुक्त राष्ट्र महासभेचे कामकाज अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी ‘UN80’ सुधारणा उपक्रम आणि सुरक्षा परिषदेच्या विस्तारावर भर देण्यात आला. याशिवाय, संयुक्त राष्ट्रांमधील ‘हिंदी दिवस २०२६’ कार्यक्रमात सहभाग नोंदवत भारतीय-अमेरिकी समुदायाशी भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यावर पाचव्या दिवशी चर्चा झाल्याचे खासदार वाजेंनी म्हटले.
नाशिकचे प्रतिनिधित्व करणे अभिमानास्पद!
ज्या सभागृहात जगातील राष्ट्रे मानवतेच्या भविष्याची दिशा ठरवतात, तिथे नाशिकचे आणि भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा व अविस्मरणीय क्षण होता. जागतिक व्यासपीठावर भारताचा आवाज मांडण्याचा सन्मान आणि आंतरराष्ट्रीय अनुभवांची शिदोरी घेऊन मी मायदेशी परतत आहे.
राजाभाऊ वाजे, खासदार नाशिक लोकसभा मतदारसंघ




