नाशिक । प्रतिनिधी Nashik
मागच्या वर्षी शास्तीवर तब्बल 95 टक्के माफी देऊन अभय योजना महापालिकेकडून राबविण्यात आली होती, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे नियमित करदात्यांसाठी मनपाकडून १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत सवलत योजना राबवली जाणार आहे. मालमत्ताधारकांनी त्याचा लाभ घेत कर भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा महापालिकेने रेकाॅर्डब्रेक २५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल केला. त्यात सवलत योजना महत्वपूर्ण होती. नियमित करदात्यांना प्रोत्साहन म्हणून महापालिका करसंकलन विभाग सवलत योजना राबवते. मालमत्ता धारकांनी १ ते ३० एप्रिल या कालावधीत कर भरणा केल्यास त्यांना एकूण बील रक्कमेवर आठ टक्के सूट दिली जाते. हाच कर भरणा आॅनलाईन अदा केल्यास दहा टक्के सूट मिळते. मे महिन्यात कर अदा केल्यास पाच टक्के व जून महिन्यात तीन टक्के सूट दिली जाते.
आर्थिक सवलत मिळत असल्याने मालमत्ताधारकही त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात. मागील वर्षी या तीन महिन्याच्या कालावधीत तब्बल ११० कोटींचा मालमत्ता कर भरणा झाला होता. त्यामुळे मनपाला सवलत योजना हमखास पावते व मनपाची तिजोरी मालामाल होते हे पहायला मिळते. यंदाही दरवर्षीप्रमाणे एप्रिल ते जून महिना या कालावधीत सवलत योजना लागू राहणार आहे.
महापालिका प्रशासनाने नियमित करदात्यांसाठी एप्रिल ते जून या कालावधीत सवलत योजना लागू केली आहे. मालमत्ताधारकांनी करभरणा करुन सवलतीचा लाभ घ्यावा.
– अजीत निकत, उपायुक्त करसंकलन विभाग मनपा