नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक मनपा (Nashik NMC) शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटील (Bapusaheb Patil) यांनी शिक्षक समायोजन बदल्या व मुख्यध्यापक नेमणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार केल्याचे समोर आले असून हे प्रकरण विधीमंडळात गाजले. शिक्षक आ. किशोर दराडे (MLA Kishor Darade) यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी बापूसाहेब पाटील यांची बदली करत मनपा अतिरिक्त आयुक्तांना पंधरा दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान उद्या (दि. १३) पासून प्रत्यक्ष चौकशी सुरू होणार आहे.
चौकशीचे आदेश ५ मार्च रोजीच मनपाला मिळाले असल्याची माहिती मिळाली असून चौकशी समितीत मनपाचे अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्यासह प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, मुख्य लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरुट व मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड यांचा समावेश आहे. एका बदलीसाठी सात ते दहा लाख रुपयांचा रेट होता, अशी कबुली खासगीत काही शिक्षकांमध्ये चर्चा आहे. मनपा शिक्षण विभागातील (Municipal Education Department) भ्रष्टाचार पुन्हा चव्हाट्यावर आला असून माजी शिक्षणाधिकारी सुनीता धनगर रंगेहाथ लाच घेतांना पकडल्यानंतर आता विद्यमान शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. महिनाभरापूर्वी जिल्हा परिषदेतील शिक्षकांची मनपा शिक्षण विभागात समायोजन करण्यात आले होते. मात्र जिल्हा परिषद शाळांमध्ये अगोदरच शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. तरी देखील शिक्षकांचे मनपा शाळांमध्ये समायोजन करण्यात आले.
तसेच मुख्यध्यापकांचीही नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक होती. मात्र शिक्षणाधिकारी पाटील यांनी कोणालाही न जुमानता समायोजन प्रक्रिया राबवली, विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विधीमंडळात लक्षवेधी मांडली होती. त्यास शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी या प्रकरणाची मनपा प्रशासनाकडून चौकशी सुरु असल्याचे सांगितले. मात्र आमदारांचे या कारवाईने समाधान झाले नाही. त्यांनी शासनाला जुमानत नसलेल्या शिक्षणाधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली. मंत्री उदय सामंत यांनी बापूसाहेब पाटील यांच्या बदलीचे आदेश देत पुढील पंधरा दिवसांत चौकशी अहवाल सादर करा, असे आदेश दिले आहे. त्यानुसार उद्यापासून चौकशी सुरू होणार आहे. तर येत्या काही दिवसात त्याचा अहवाल मनपा आयुक्तांना सादर होणार आहे.
सखोल चौकशी
मिळालेल्या माहितीनुसार पाटील यांच्यावरील प्रत्येक आरोपाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बिंदू नियमावलीसह जिल्हा परीषदेकडून काय प्रस्ताव आले व त्यावर काय कारवाई झाली, जागा रिकाम्या होत्या का, असे सर्व प्रकरणांच्या कागदपत्रांची चौकशी होणार आहे.
पाटील मनपात
मंगळवारी मुंबईत विधीमंडळात गेलेले नाशिक मनपाचे शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटील यांची शासनाने चौकशी लावली आहे. मात्र मनपाला शासनाकडून निलंबन किंवा बदलीचे कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे पाटील आज (दि.१२) मनपात येऊन आपल्या कार्यालयात बसून काम करीत होते. दरम्यान ‘चांगल्या कामाचे’ फळ मिळत आहे असे सांगून, अन्याय झाल्यास मॅटमध्ये जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.