नविन नाशिक | प्रतिनिधी
अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असतानाच नाशिकमध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला सुरुवात केली आहे. या दरम्यान, नविन नाशिक विभागात मोठी घडामोड घडली आहे. भाजपचे उमेदवार दिपक सुधाकर बडगुजर यांनी माघार घेतली आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकांची सध्या रणधुमाळी सध्या सुरु आहे. आज शुक्रवारी (दि. २ जानेवारी) रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत आहे. यादरम्यान, नविन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक २५ ड मधून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले दिपक सुधाकर बडगुजर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशान्वये प्रभाग क्र. २५ ड मधून अर्ज माघारी घेत आहे, मात्र प्रभाग क्रमांक २९ अ मधून ते निवडणुक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Nashik Politics: माघारीसाठी आज अंतिम मुदत; गुप्त बैठकांना वेग, दुपारनंतर चित्र होणार स्पष्ट
दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी पाहायला मिळत असून, दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. या दरम्यान, अपक्ष तसेच बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांकडून करण्यात येत आहे. अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवार यादी स्पष्ट होणार असल्याने निवडणूक चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.




