पंचवटी | प्रतिनिधी | Panchavati
नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी प्रभाग समितीची सभा सभापती रोहिणी पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विभागातील पाणीटंचाई, रस्त्यांवरील खड्डे, पाईपलाईन गळती, घंटागाडीचे नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेसह विविध प्रश्नांवर सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
प्रभाग १ चे सदस्य प्रवीण जाधव यांनी पाणीपुरवठा दोन वेळा करण्याची मागणी केली. तसेच विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामांवर परिणाम होत असल्याचे सांगितले.प्रभाग २ चे सदस्य रिद्धेश निमसे यांनी परिसरातील १७ ठिकाणी पाईपलाईन गळती होत असल्याची माहिती देत ती तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली.घाट परिसरातील उघडी विहीर बुजवण्याची सूचनाही त्यांनी केली.
प्रभाग ६ मधील सदस्यांनी नव्या वस्त्यांमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी केली. तसेच रस्ते खोदून कामे रखडत असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.प्रभाग ५ चे सदस्य कमलेश बोडके यांनी मनपाने भाड्याने यंत्रसामग्री घेण्याऐवजी कायमस्वरूपी जेसीबी आणि ट्रॅक्टर खरेदी करावेत, अशी मागणी केली.
प्रभाग १ मधील सदस्य रंजना भानसी यांनी रस्त्यांवरील खड्डे, सफाई कर्मचाऱ्यांची अनियमितता आणि ‘अमृत’ योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार केली.
प्रभाग ३ मधील सदस्य प्रियांका माने यांनी पाईपलाईनसाठी खोदलेले खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली. गार्डनची दुरवस्था तसेच घंटागाडीचा बदललेला मार्ग यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभाग २ मधील सदस्य दिपाली गिते यांनी घंटागाडीचे वेळापत्रक निश्चित करण्याची मागणी केली.सभेअखेर सभापती रोहिणी पिंगळे यांनी सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.तसेच प्रभाग ६ मधील रखडलेले जलकुंभाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.या सभेला विविध विभागांचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते.
…तर नागरिकांचे प्रश्न मांडणार कोण? पहिल्याच सभेत लोकप्रतिनिधींची दांडी!
पंचवटी प्रभाग समितीच्या चालू वर्षातील पहिल्याच महत्त्वपूर्ण सभेत काही प्रमुख लोकप्रतिनिधींनी अनुपस्थिती लावल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे.“पहिल्याच सभेत लोकप्रतिनिधी अनुपस्थित राहणार असतील, तर नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर कोण मांडणार?” असा सवाल उपस्थित होत आहे.
अनुपस्थित सदस्य : रुपाली नन्नावरे, नामदेव शिंदे, चंद्रकला धुमाळ, हेमंत शेट्टी, सरिता सोनवणे, चित्रा तांदळे.
उपस्थित सदस्य : प्रवीण जाधव, रंजना भानसी, दिपाली गिते, रिद्धेश निमसे, सुरेखा खेताडे, जेजुरकर, प्रियांका माने, जुई शिंदे, गौरव गोवर्धने, मच्छिन्द्र सानप, मोनिका हिरे, सागर लामखेडे, कमलेश बोडके, गुर्मीत बग्गा, प्रमोद पालवे, रोहिणी पिंगळे आणि वाळू काकड.
महापालिकेचा कारभार रामभरोसे; सभेत ‘झेरॉक्स नगरसेवकां’ची चर्चा
प्रभाग सभेत लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीइतकीच चर्चा काही महिला सदस्यांचे पती किंवा नातेवाईकांच्या उपस्थितीची झाली. अधिकृत नियमांनुसार केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाच सभेत सहभागी होण्याचा अधिकार असताना, तथाकथित ‘झेरॉक्स नगरसेवक’ अधिकाऱ्यांच्या दालनात उपस्थित राहिल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
“मत आम्ही महिला उमेदवाराला दिले की त्यांच्या नातेवाईकांना?”असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत असून, प्रशासनाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगली आहे.





