नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिंहस्थासाठी बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी (Devotees) पार्किंगची मोठी जागा लागणार आहे. भारतातून येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता जागा अधिक लागू शकते, त्यामुळे जेथे जेथे मोकळी जागा अधिक मिळू शकते, त्याच ठिकाणांची पाहणी काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी (NMC Officer) केली होती. मात्र त्यानंतर इतरही पार्किंगच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. सर्व माहिती एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ती पाठविण्यात आली.
२०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका कामाला लागली असून मनपा आयुक्तांनी नुकताच सिंहस्थासाठी त्रिस्तरीय पार्किंगसह अंतर्गत व बाह्य वाहनतळांबाबत प्राथमिक आढावा घेतला. कुंभमेळ्यात नाशिकमध्ये (Nashik) येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी पाहता विविध विभागांनी तयार केलेल्या पार्किंगच्या आराखड्याचा आढावा मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी घेऊन सूचना केल्या. यापूर्वी शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांना थेट शहराबाहेरच थांबविले जात होते. मग तेथून आतमध्ये सिटीलिंक किंवा इतर वाहनांनी शहरात येता येत होते. पण आता नवीन आराखड्यानुसार हा आराखडा त्रिस्तरीय करण्यात आला आहे.
दरम्यान, या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उदय पालवे, तसेच पोलीस खात्याचे अधिकारीही उपस्थित होते. या पूर्वी कुसुमाग्रज उद्यानापासून संपादित रस्त्याने मखमलाबाद रोड व त्या रोडवरील मिसिंग लिंकचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. पेठरोडच्या सर्वच रस्त्यांबरोबरच सीता सरोवर म्हसरूळ येथील पौराणिक ठिकाणांची पाहणी करण्यात आली होती. शिवाय म्हसरूळ-वरवंडी रोडवरील कामांची पाहणीही आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांनी केली होती. सिंहस्थात येणाऱ्या भाविकांच्या आगमनाने शहरात गर्दी वाढणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू आहे. बाहेरून येणाऱ्या वाहनांना थेट शहरात प्रवेश न देता ते वाहनतळावर जाणार व तेथून ते वाहन पुन्हा आतमध्ये दुसऱ्या पार्किंगमध्ये येईल. तेथून पुन्हा सिटीलिंक (Citylink) किंवा उपलब्ध वाहनांनुसार मुख्य कुंभाच्या ठिकाणी येता येईल.