नाशिक | Nashik
महापालिकेच्या १२२ जागांसाठी आज (दि.१५) रोजी सकाळी साडे सात वाजेपासून शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदान पार पडत आहे. मतदानाच्या सुरुवातीला सकाळी काही प्रभागांतील ईव्हिएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या होत्या. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ते मशील तातडीने बदलल्याने मतदान प्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर सकाळी पहिल्या दोन तासांत ६.५१ टक्के मतदान झाले होते. पण नंतर ही आकडेवारी वाढल्याचे बघायला मिळाले.
हे देखील वाचा : Nashik Municipal Election : नाशिकमध्ये सकाळपासून मतदानास सुरुवात; ‘या’ प्रभागांत EVM मध्ये बिघाड झाल्याने उडाला होता गोंधळ
सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत शहरात १४.३१ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे दुपारी दोन पर्यंत ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. तर प्रभाग क्रमांक २१ मधील गोसावी वाडी परिसरातील बुथ क्रमांक ३६ मध्ये मतदान यंत्र प्रारंभीच बंद पडले होते. त्याजागी दुसरे मशीन बसविल्यानंतर ते देखील बंद पडल्याने गोंधळ उडाला होता. पण नंतर सुरळीतपणे मतदान सुरु झाले.
दुसरीकडे प्रभाग क्रमांक २९ मधील ‘अ’ गटातील अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी भाजप उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या सावतानगर येथील कार्यालयाबाहेर पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik Politics : भाजप उमेदवार बडगुजरांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न; पोलिस छावणीचे स्वरूप
दरम्यान, नाशिक महापालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी ७३५ उमेदवार (Candidate) रिंगणात असून, त्यामध्ये ५२७ राजकीय पक्षांचे व २०८ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती होणार आहेत. या निवडणुकीत एकूण १३ लाख ६० हजार ७२२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ६ लाख ५६ हजार ६७५ महिला आणि ७ लाख ३ हजार ९६८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. तर तृतीयपंथी ७९ मतदार आहेत.




