नाशिक | प्रतिनिधी Nashik
महिला आयोगाचे काम करत असताना अनेक राज्यांमध्ये जाणे होते. प्रत्येक राज्यातील खानपान आणि संस्कृती वेगळी आहे. पण नाशिक सारखे काहीच देशात कुठेच काही नाही. आईच्या मायेने बघणारे नाशिक आहे. नाशिकने घडवलेली ही मुलगी आज देशातल्या महिलांचे प्रश्न सोडवत आहे. माझ्यासारख्या अनेक मुली घडल्या पाहिजे. देशातली उत्तम संस्कृती महिलांनी सांभाळली आणि वाढवलीही. त्यामुळे महिलांना भारतात विशेष स्थान आहे. म्हणूनच आपली भरारी अंगणापासून अतंराळापर्यत आहे. असे गौरवोद्गार महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काढले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर, आदिवासी विकास संस्थेच्या उपाध्यक्ष नयना गुंडे, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दिप्ती देशपांडे आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना आणि गोदा आरतीने झाली.
पुढे बोलताना रहाटकर म्हणाल्या की, अनेक महापुरुष महिलांनी घडवले. त्यामुळेच सजग महिला म्हणून आपण काम केले पाहिजे. तसे उत्तम संस्कार आपल्याला मिळाले आहेत. मात्र आपला मुख्य पाया असलेली विवाह संस्था आज अडचणीत आली असून अनेकवेळा कुटुंब कलहाचेच अनेक प्रश्न सोडविण्यासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. ही विवाह संस्था वाचविण्यासाठी पुरुषांनीही हातभार लावण्याची गरज आहे. याबरोबरच समाजासाठी महिलांनी पुढे यायला पाहिजे. त्यासाठी पुरुषांनी महिलांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच प्रत्येकाची मतं वेगळी असली तरी निकोप समाज निर्माण गरज निर्माण झाल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखीत केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रिती कुलकर्णी यांनी केले. तर नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवर विजया रहाटकर यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.
सबला महिलाच समाजाचे रक्षण करते.
नाशिकची भूमी सुपीक आणि पावन आहे. त्यामुळेच इथे असलेली प्रत्येक नारी ही नारायणी असून ती नाशिकला पुढे घेऊन जाणार आहे. सभागृहात उपस्थित असलेली प्रत्येक महिला वेळ आली तर दुर्गेचा अवतार धारण करु शकते. आणि आपल्या भारतमतेची सेवा करायची असेल तर प्रत्येक महिलेने दुर्गेचा अवतार घेतलाच पाहिजे. त्यासोबतच समाजाला लागलेली वाळवी महिलेलाच दूर करावी लागणार आहे. त्यात सद्यस्थितीत भ्रष्टाचार ही खूप देशापुढे मोठी समस्या आहे. ही समस्या नष्ट करण्यासाठी आपल्याला खूप मोठे कार्य करावे लागणार असून महिला जेव्हा सबला होईल तेव्हा ती समाजाचे रक्षण करेल.