नाशिक | विजय गिते | Nashik
राज्य शासनाकडून कर्जमाफीची (Loan Waiver) घोषणा होईल, या केवळ ‘अपेक्षेपोटी’ जिल्ह्यातील चालू कर्जदारांनी आपली थकबाकी भरण्याकडे पाठ फिरवली आहे. याचा मोठा फटका नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (एनडीसीसी) बसला असून, मार्च अखेर बँकेची वसुली अवघी ८.५५ टक्के इतकीच झाली आहे. विशेष म्हणजे, कर्ज (Loan) न भरल्यामुळे हे शेतकरी आता शासनाच्या प्रोत्साहनपर अनुदानालाही मुकण्याची भीती निर्माण झाली आहे.
जिल्हा बँकेने (District Bank) ३१ मार्च २०२६ अखेर अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीचे आणि बिगर शेती कर्ज मिळून एकूण १९३७ कोटी ९४ लाख रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ १६५ कोटी ७६ लाख रुपयेच बँकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. गेल्या वर्षी याच काळात वसुलीचे प्रमाण ९.६४ टक्के होते, जे यंदा घटून ८.५५ टक्क्यांवर आले आहे. शासनाकडून कर्जमाफीची घोषणा होईल, या आशेने शेतकरी थांबले आहेत. मात्र, अद्याप अशी कोणतीही घोषणा न झाल्याने बँकेची थकबाकी वाढतच चालली आहे.
बँकेच्या आकडेवारीनुसार, जुनी थकबाकी १,४७६ कोटी ५९ लाख ७२ हजार रुपये आहे, तर यावर्षीची चालू थकबाकी २९५ कोटी ५८ लाख ३३ हजार रुपये इतकी आहे. एकूण मागणीच्या तुलनेत थकबाकीचे प्रमाण तब्बल ९१.४५ टक्के इतके प्रचंड आहे. यात प्रामुख्याने शेती कर्जाचा मोठा वाटा आहे. बँकेच्या प्रशासकांनी दिलेल्या माहितीनुसार, जे शेतकरी चालू कर्जाची वेळेत परतफेड करतात, तेच शासनाच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरतात. मात्र, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत अनेक चालू कर्जदारांनी पैसे भरले नाहीत. ‘थकीत चालू कर्जदार जेव्हा आपली थकबाकी पूर्ण भरतील, तेव्हाच ते या अनुदानासाठी पात्र ठरू शकतील,’ अशी तांत्रिक अडचण आता निर्माण झाली आहे. कर्जमाफीच्या केवळ अपेक्षेने कर्ज थकवू नका. चालू कर्जदारांनी आपली थकबाकी त्वरित भरून शासनाच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घ्यावा, अन्यथा, तांत्रिक कारणांमुळे आपण या लाभापासून वंचित राहू शकता.
मागणी व वसुलीची आकडेवारी (कोटीत)
एकूण थकबाकी मागणी – १९३७.९४ कोटी
प्रत्यक्ष झालेली वसुली – १६५.७६ कोटी
जुनी थकबाकी वसुली – ५८.७८ कोटी
चालू कर्ज वसुली – १०६.९७ कोटी





