नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Bank) ७२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऐनवेळच्या विषयात निफाड सहकारी साखर कारखान्याची थकबाकी वसुली, ताबा आणि हस्तांतराच्या मुद्द्यावर बोलू न दिल्याने सभेचे कामकाज संपल्यानंतर जोरदार गदारोळ झाला. यावेळी संतप्त सभासद व ठेवीदारांनी बँकेचे प्रशासक संतोष बिडवई यांना घेराव घालत विविध प्रश्नांचा भडिमार केला. ऐनवेळच्या विषयांवर चर्चा न करता सभा आटोपल्याचा आरोप करत सभासदांनी बँक प्रशासनाचा (Bank Administrator) निषेध केला.
शहरातील कालिदास कला मंदिर येथे सोमवारी (दि.२८) आयोजित सभेचे नियमित कामकाज संपल्यानंतर ऐनवेळच्या विषयांवर (Subject) चर्चा करून प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असे आश्वासन प्रशासक बिडवई यांच्याकडून दिले जात होते. मात्र, सभागृहात गोंधळ निर्माण झाल्यानंतर सभासदांना बोलू न देता राष्ट्रगीत सुरू करून सभा घाईघाईने संपवण्यात आली. प्रशासकांसह अधिकारी सभागृहातून निघून गेल्याचा आरोप निफाड शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र मोगल यांनी सभेनंतर माध्यमांशी बोलतांना केला. सभासद व शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
७६ कोटींच्या वसुलीचा हिशोब कुठे?
निफाड सहकारी साखर कारखान्यासंदर्भात (Niphad Cooperative Sugar Factory) जेएनपीटीकडून वसूल करण्यात आलेल्या ७६ कोटी रुपयांच्या रकमेचे काय झाले?, असा थेट सवाल बोडके यांच्यासह सभासदांनी केला आहे. कारखाना चालविण्यास देण्याची तसेच विक्रीची प्रक्रिया कोणत्या पद्धतीने झाली. बँकेकडून सुमारे १४७ कोटी रुपयांची वसुली दाखविली जात असताना २०१७ पासूनची प्रलंबित थकबाकी किती आहे, त्याची वसुली कशी झाली, याची उत्तरे आम्हाला मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
सरफेसी कायद्याच्या वापरावर आक्षेप
२३ डिसेंबर २०२२ रोजी सरफेसी कायद्याच्या कलम १४ अंतर्गत कारखान्याचा ताबा घेताना आवश्यक मंजुरीच्या नियमांचे पालन झालेले नाही. तसेच ९ मार्च २०१८ रोजी तत्कालीन सहकार सुभाष देशमुख यांच्यासोबत झालेल्या बैठकीत १०५ कोटी रुपये भरून ३४ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा प्रस्ताव होता. साईकृपा ग्रुपने ७५ लाख रुपये भरल्यानंतरही बँक अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे पुढील प्रक्रिया रखडल्याचा आरोपही नसल्याचा आरोप राजेंद्र मोगल यांनी माध्यमांशी बोलतांना केला.
मुख्यालयावर मोर्चाचा इशारा
निफाड कारखान्याची वसुली, ताबा, हस्तांतरण आणि आर्थिक व्यवहारांची वस्तुस्थिती बँक प्रशासनाने तातडीने जाहीर करावी. याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास प्रशासकांच्या निवासस्थानावर तसेच जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा बोडके यांनी दिला आहे.
बिडवई काय म्हणाले?
सभा राष्ट्रगीता नंतर समाप्त झाल्यावर निफाड कारखान्याची सभासद व कामगार यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेत व्यासपीठावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे प्रकरण बँकेने वेळोवेळी कारखान्याचे सभासद कामगार तालुक्यातील ऊस उत्पादक व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत वेळोवेळी बैठका घेण्यात आलेल्या आहेत. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्याबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे असतानाही गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे बँकेचे प्रशासक संतोष बिडवे यांनी स्पष्ट केले.




