नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी शहर पोलिसांनी (City Police) सुरू केलेली व्हाट्सॲप हेल्पलाइन सध्या केवळ आकडेवारीच्या खेळात अडकल्याचे चित्र आहे. पोलिस आयुक्तालयाकडून आतापर्यंत तब्बल १८ हजार ७३४ तक्रारी व सूचना प्राप्त झाल्याचा दावा केला जात असला, तरी सध्या ही हेल्पलाइन ठप्प झाल्याचा अनुभव नागरिकांना (Citizen) येत आहे. पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतील गणितातही मोठी तफावत दिसून येत असून, १ हजार ०९६ तक्रारी अद्याप प्रलंबित असल्याने या संवाद सेतूच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या संकल्पनेतून २७ डिसेंबर २०२३ रोजी ही हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली होती. फोटो आणि व्हिडिओच्या पुराव्यांसह तक्रार करण्याची सुविधा असल्याने नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मदत, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई आणि अवैध धंद्यांवर छापे टाकल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. तक्रार निवारणानंतर फीडबॅक घेण्याची सोय असल्याने हा उपक्रम पोलीस आणि नागरिकांमधील दुवा ठरला होता.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून या क्रमांकावर पाठवलेल्या संदेशांना कोणतेही प्रत्युत्तर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आयुक्तालयाने हेल्पलाइनवरील कार्यवाहीबाबत दिलेल्या आकडेवारीत एकूण प्राप्त १८ हजार ७३४ मेसेजपैकी प्रलंबित, प्रक्रियेत, निकाली आणि कार्यक्षेत्राबाहेरच्या तक्रारींची बेरीज केवळ १० हजार ९५८ इतकीच भरते. उर्वरित ७ हजार ७७६ मेसेज नेमके कोणत्या वर्गवारीत मोडतात किंवा त्यांचे काय झाले, याचा कोणताही उल्लेख आकडेवारीत नाही. याशिवाय, पोलिस ठाण्यांशी (Police Station) संबंधित सर्वाधिक ६ हजार ५४५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
तक्रारींचा लेखाजोखा (पोलिसांच्या दाव्यानुसार)
एकूण प्राप्त मेसेज : १८,७३४
निकाली काढलेल्या तक्रारी : ८,६७३
कार्यक्षेत्राबाहेरील तक्रारी : १,१११
अद्याप प्रलंबित : १,०९६
सध्या प्रक्रियेत : ७८
विभागनिहाय तक्रारींची स्थिती :
पोलिस ठाणे संबंधित : ६,५४५
वाहतूक समस्या : २,१४४
ध्वनी प्रदूषण : ५६७
महिला सुरक्षा : १९४
अंमली पदार्थ : १११
गस्त वाढवण्याबाबत : ४८




