नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या बेफिकीर चालकांमुळे होणारे प्राणघातक अपघात (Accident) रोखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) सुरू केलेल्या मोहिमेला यश आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पहिल्या १० महिन्यांत ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या चालकांवरील कारवाईत तब्बल २३३ टक्क्यांनी (२३५ केसेस) वाढ झाली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ७ क्रिटिकल कॉरिडॉरवर पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे.
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या आदेशान्वये, नाशिक शहरात रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यू व जखमींचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मुख्यालय व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी, तसेच शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांच्या देखरेखीखाली शहरातील ७ संवेदनशील पोलीस ठाण्यांच्या (Police Station) हद्दीत क्रिटिकल कॉरिडॉर पथके स्थापन करण्यात आली आहेत.
ही पथके मुख्य रस्ते, हायवे आणि अपघातप्रवण क्षेत्रांत सातत्याने गस्त घालून नियमभंग करणाऱ्यांवर थेट कारवाई करत आहेत. शहरातील रस्ते अपघातांमधील प्राणहानी रोखणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. मद्यपान करून वाहन चालवणे हे स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे. त्यामुळे नाशिक शहरातील सर्व वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे. वाहतूक विभागाची ही धडक मोहीम यापुढेही अशीच सतत आणि अधिक कडकपणे सुरू राहील, असे चंद्रकांत गवळी आणि माधव रेड्डी यांनी सांगितले.
ऑक्टोबर महिन्यातच १,६१५ कारवाया
वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२६ (१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६) या एकाच महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर एकूण १,६१५ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये विनाहेल्मेट, ट्रिपल सीट, रॉग साईड ड्रायव्हिंग आणि विशेषतः मद्यपी चालकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी (२०२५) जानेवारी ते ऑक्टोबर या काळात मद्यपी चालकांवर अवघ्या १०१ केसेस झाल्या होत्या. मात्र यंदा याच काळात ३३६ चालकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ऑक्टोबर २०२६ या एकाच महिन्यात १२६ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
आकडेवारी काय सांगते?
वर्ष २०२५ मधील एकूण कारवाया: ११५ केसेस
१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२५: १०१ केसेस
१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२६: ३३६ केसेस
एकूण वाढ: +२३५ केसेस (तब्बल २३३ टक्के वाढ)
केवळ ऑक्टोबर २०२६ मधील कारवाई: १२६ केसेस




