नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon
येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कायदेशीर प्रक्रियेसाठी शेत जमिनीच्या खरेदी खताच्या दस्तांची प्रमाणित नक्कल प्रत देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील डाटाएंट्री ऑपरेटर धारासिंग बाबुलाल राठोड व खाजगी व्यक्ती सागर बोरसे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईने येथील शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांच्या आजोबा व इतरांनी परस्पर विक्री केलेली असल्याने पुढील कायदेशीर लढाई करण्यासाठी त्यांना आजोबा व इतरांनी विक्री केलेल्या शेत जमिनीच्या खरेदी खतांच्या दस्तांची प्रमाणित नक्कल हवी होती. यासाठी १८ मार्चरोजी त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. खासगी व्यक्ती सागर बोरसे आणि आयटी सहाय्य्क धारासिंग राठोड यांंनी खरेदी खतांच्या दस्तांची प्रमाणित नक्कल प्रत काढून देण्यासाठी ३२० रुपये शासकीय शुल्क भरण्यास सांगितले. नंतर प्रमाणित नक्कल प्रत देण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात संशयितांनी १२०० रुपये लाचेची मागणी करत तडजोडीअंती एक हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत दुय्यम निबंधक कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटर धारासिंग बाबुलाल राठोड (५३, नांदगाव) आणि सागर राजेंद्र बोरसे (३३, नांदगाव) यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हवालदार दिनेश खैरनार, अविनाश पवार, समीर शेख यांचा सहभाग होता. तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.दोन्ही आरोपींविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, शासकीय कामकाजासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक ९९३०९९७७०० उपलब्ध करून देण्यात आला आहे.




