Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik News : जिल्ह्यातील १३३ गावांना पूर्णवेळ तलाठी

Nashik News : जिल्ह्यातील १३३ गावांना पूर्णवेळ तलाठी

सजावाटप; ग्रामस्थांची सोय, कामावर हजर होण्याचे आदेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे (Loksabha and Vidhansabha Election) अडकून पडलेल्या जिल्ह्यातील १३३ ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या (तलाठी) नियुक्तीला आचारसंहितेनंतर मुहूर्त लागला आहे. तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना महसूल सजांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे १३३ गावांना (Villages) नव्याने पूर्णवेळ तलाठी मिळाले आहेत. दरम्यान, उर्वरित ४० जणांची प्रतीक्षा यादीतून निवड केली जाणार आहे.

- Advertisement -

मागील वर्षी राज्यात एकाच वेळी ४,४३३ तलाठी भरतीची (Talathi Recruitment) प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात नाशिक जिल्ह्यातील १९६ जागांकरता तीन महिन्यांत परीक्षा पार पडली. परंतु पेसा क्षेत्रातील जागांबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने नाशिकसह (Nashik) राज्यातील १३ जिल्ह्यांमधील भरती प्रक्रिया कायदेशीर बाबीत अडकली होती. त्यावर उपाय म्हणून शासनाने पेसा क्षेत्र वगळून अन्य ठिकाणची पदभरती पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने फेब्रुवारी- मार्च महिन्यात १७३ पैकी १६५ उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करताना प्रतीक्षा यादी घोषित केली. त्यानंतर लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने पुढील प्रक्रिया थांबली होती.

जून महिन्यात आचारसंहिता (Code of Conduct) शिथिल होताच जिल्हा प्रशासनाने संबंधित प्रशिक्षणार्थीना जिल्ह्यातील विविध तालुक्यांत तीन महिन्यांच्या प्रशिक्षणाकरता पाठवले. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होती. त्यामुळे प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीच्या प्रतीक्षेतील या १३३ ग्राम महसूल अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या आदेशान्वये नव्याने स्वतंत्र सजांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे संबंधित गावांमधील महसूलसह अन्य कामकाजाला गती मिळेल.

ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) हे गावातील सातबारा नोंदणी व ई-फेरफार, पीकपेरा, विविध प्रकारचे दाखले वितरण, नैसर्गिक आपत्तीमधील पंचनामे यासह विविध प्रकारची कामे पार पडतात. मात्र मध्यंतरीच्या काळात भरतीच नसल्याने एका अधिकाऱ्यांकडे किमान चार ते पाच गावांचा कारभार देण्यात आला होता. परिणामी ठराविक वेळेतच गावात ते उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांना कामांसाठी तिष्ठत राहावे लागत होते. पण आता नव्याने ग्राम महसूल अधिकारी नियुक्त केल्याने ग्रामस्थांची विविध कामांसाठीची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.

जिल्ह्यात १७३ जागा भरावयाच्या होत्या. परंतु यादी १६५ जणांचीच जाहीर करावी लागली. आठ जण सुरुवातीलाच हजर झाले नाही. तर १६५ पैकी केवळ १३३ जणच प्रशिक्षण पूर्ण करू शकले. उर्वरित ३२ जण इतर खात्यात नोकरीला किंवा अन्य कारणांमुळे आलेच नाही. त्यामुळे एकूण ४० जागांसाठी आता पुन्हा प्रतीक्षा यादीतील उमेवारांना संधी दिली जाईल. त्यांची कागदपत्रे पडताळणी करून लवकरच नियुक्ती दिली जाईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

तालुकानिहाय तलाठी

इगतपुरी २, चांदवड १५, देवळा १०, बागलाण ११, नाशिक ७, निफाड १२, सिन्नर २६, येवला १४,, मालेगाव २५, दिंडोरी ३, नांदगाव १७, एकूण १३३.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...