नाशिक | प्रतिनिधी | Nashik
समाजात हुंडाबळी, पत्नीच्या छळासह कौटुंबिक हिंसाचाराच्या (Domestic Violence) घटना वाढतच आहेत. विशेष म्हणजे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या (Nashik City Police Commissionerate) महिला सुरक्षा शाखेत दाखल झालेल्या तक्रारींपैकी सर्वाधिक ३८ टक्के म्हणजेच २६२ तक्रारदार व ज्यांच्या विरोधात तक्रारी होत्या ते महिला व पुरुष, कुटुंबे महिला सुरक्षा शाखेत हजरच राहिले नाहीत. त्यामुळे या प्रकरणांचा निपटारा करण्यात आल्याचे गृहित धरण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षकारांमध्ये बाहेरच सामंजस्याने वादविवाद मिटल्याने ते सुरक्षाशाखेत येत नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
पती-पत्नीमधील वाद (Husband and Wife) मिटवण्यासाठी किंवा त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य पोलीस दलाकडून सर्वत्र महिला सुरक्षा शाखा कार्यरत असते. या शाखेत कौटुंबिक वादाने त्रस्त झालेल्या महिला पतीसह सासरच्यांविरोधात तक्रारी नोंदवितात. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत महिला सुरक्षा शाखेकडे ६९० तक्रारी आल्या. मात्र, त्यापैकी २६२ तक्रारदार गैरहजर राहिले असून दाखल तक्रारींपैकी ५३७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. तर १५३ प्रकरणांचा तपास प्रलंबित आहे. दरम्यान, महिला सुरक्षा शाखेत कौटुंबिक वादाच्या तक्रारी दिल्या जातात.
त्यानुसार गत वर्षात ६९० विवाहितांनी पती, सासरच्यांविरोधात कौटुंबिक, शारीरिक, मानसिक छळाच्या तक्रारी दिल्या. या तक्रारींची दखल घेत शाखेमार्फत तक्रारदारासह ज्यांच्याविरोधात तक्रार आहे, त्यांच्याकडून माहिती घेतली गेली. त्यानंतर दोन्ही पक्षांचे समुपदेशन करून दोघांचा संसार पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यातील काही तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याने संबंधित पक्षकाराविरोधात गुन्हे दाखल (Case Filed) करण्यात आले. तर काही प्रकरणांमध्ये समुपदेशनानंतरही समझोता न झाल्यास ती प्रकरणे न्यायालयात (Court) पाठविण्यात आली.
समुपदेशनामुळे ७३ जोडपे एकत्र
महिला (Women) सुरक्षा शाखेत दाखल एकूण तक्रारींवर कारवाई सुरु असताना, त्यातील ७३ विवाहितांचे समुपदेशन व दोन्ही कुटुंबास सामंजस्याने समझोता घडवून आणण्यात आला. त्याची परिणती अशी झाली की, हे ७३ जोडपे एकत्र नांदण्यास तयार होऊन त्यांच्या कुटुंबात आनंद पसरला आहे.
नांदणाऱ्यांचाही पाठपुरावा
मोबाईलचा वाढता वापर, सोशल मीडिया, स्वातंत्र्य, उच्चभ्रू जीवनशैली आदी कारणांमुळे दाम्पत्यांमध्ये सर्वाधिक वाद होत असल्याचे समोर येत आहे. महिला सुरक्षा सेलकडे तक्रार आल्यानंतर फॉर्म भरून घेतला जातो. मात्र, काही तक्रारदार तक्रार केल्यानंतर पुन्हा येत नाही. येणाऱ्यांची समस्या जाणून त्यांचे समुपदेशन केले जाते. समुपदेशनाने समस्या सुटली नाही तर न्यायालयात प्रकरण दाखल केले जाते.
आम्रपाली तायडे, पोलीस निरीक्षक,महिला सुरक्षा शाखा
अशी झाली कार्यवाही
तक्रारी | नांदण्यास तयार | न्यायालयीन | गुन्हा दाखल | गैरहजर | प्रलंबित | निपटारा |
६९० | ७३ | १०३ | ८७ | २६२ | १५३ | ५३७ |