त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर (Nashik and Trimbakeshwar) येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्र्यंबकेश्वरसाठी (Trimbakeshwar) स्वतंत्र ८३३ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या वृत्ताला त्र्यंबक नगरपालिकेच्या प्रशासक श्रिया देवचके यांनी दुजोरा दिला आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री गिरीश महाजन, राज्याचे सचिव, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकारकडून कुंभमेळा (Kumbh Mela) संबंधित विविध २३ खात्याच्या प्रतिनिधींना अधिकाऱ्यांना या बैठकीला पाचारण करण्यात आले होते. यावेळी त्र्यंबकेश्वर नगरीचा सर्वांगीण विकास व नागरिकांच्या तसेच भाविकांच्या मूलभूत सुविधा यांच्याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले. तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन पथ आणि रिलीजियस कॅरिडोर देखील होणार आहे. याशिवाय त्र्यंबकेश्वरला जागतिक पटलावर आणण्यासाठी व अर्थव्यवस्थेला चालला देण्याकरिता प्रभावी ब्रँडिंग करण्यात येणार आहे. तसेच त्र्यंबकेश्वर इगतपुरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील (Maharashtra) नागा साधूंचा सर्वात मोठा कुंभमेळा त्र्यंबकेश्वरला भरत असतो. त्यामुळे त्र्यंबकेश्वर हे कुंभमेळ्याचे प्रमुख स्थान आहे. त्र्यंबकेश्वर येथून या बैठकीला नगरपालिका अभियंता स्वप्निल काकड ,पाणीपुरवठा अभियंता पूर्वा माळी, इंजिनीयर ब्राह्मणकर ,जे जे सिंग हे उपस्थित होते. या बैठकीत त्र्यंबकेश्वरसाठी स्वतंत्र ८३३ कोटीचा मोठा आराखडा मंजूर करण्यात आला असून दीर्घकाळ टिकणारी कामे कशी होतील याकडे देखील यंत्रणांनी कटाक्षाने लक्ष घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, याशिवाय भाविकांच्या दृष्टीने योग्य विकासात्मक उपाययोजना आणि विकास या कुंभमेळ्याच्या निधीतून करावा. तसेच भाविक, साधुसंतांची व यात्रेकरू वारकऱ्यांची सेवा आपण करणार आहोत याचे भान कुंभमेळा यंत्रणेने ठेवून देवाच्या दरबारात आशीर्वाद घ्यावे, कुंभमेळ्याच्या निधीतून चांगले काम करावे, अशी मागणी त्र्यंबकवासीयांकडून करण्यात आली आहे.