नाशिक | प्रतिनिधी | Nashik
द्वारका (Dwarka) सिम्ले येथील उड्डाणपुलावर (Flyover) झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झाल्यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पोलीस व आरटीओच्या अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी नाशिकमध्ये बैठक घेत तातडीने कारवाईची सूचना केली. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी महामार्गावर गस्त सुरू केली असून, नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पथकांना दिले आहेत. यासह उड्डाणपुलाच्या ‘एन्ट्री’जवळील आठ ठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांची (Vehicles) तपासणी करण्यात येणार आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्तालयात (Police Commissionerate) सोमवारी (दि. १३) दुपारी बैठक झाली. त्यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, किरणकुमार चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी महामार्ग सुरक्षा व वाहतूक शिस्त यासंदर्भात कारवाईची सूचना मंत्री महाजन यांनी केली. त्यानुसार रेडिअम नसणारी वाहने, अवजड वाहने, विरुद्ध दिशेने येणारी वाहने व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने कारवाईचा निर्णय पोलीस व आरटीओने घेतला.
यासह संबंधित ठिकाणी नाकाबंदी (Blockade) करून कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक उपायुक्त खांडवी यांनी दिली. तर, द्वारका उड्डाणपुलावर झालेल्या अपघातील मृतांना शासनामार्फत पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. तसेच या अपघातातील जखमींचा रुग्णालयातील खर्च शासन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महाजन यांनी सोमवारी (१३) सकाळी मुंबईहून नाशिकला येत अपघात स्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जावून जखमींचीही विचारपूस केली. यानंतर नियम डावलून अवजड वाहतूक करण्याचे प्रकारामुळे अपघात झाल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक
नाशिककर (Nashik) देखील सध्या वाहनकोंडीने त्रस्त आहेत. रस्त्यांवर अनेक ठिकाणी ट्रक किंवा अन्य वाहने हे बंद अवस्थेत उभे असतात. बंद पडल्यावर ते बाजूला न करता तिथेच ठेवल्यानेही अपघात होतात. अनेक वाहनांच्या मागे सुरक्षात्मक उपयायोजनांबाबतचे नियम पाळले जात नाहीत. वाहनचालक नियम पाळत नसल्याने त्याबाबतची सक्ती करावी लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील आरटीओ, परिवहन विभागाचे अधिकारी, पोलीस आणि स्थानिक संस्थांची एकत्र बैठक घेत नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे महाजन यांनी सांगितले.